आबालवृद्घांकडून मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या तक्रारी

पुणे : मनोरंजनाच्या क्षेत्रात वेबसीरिज हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. आबालवृद्धांमध्ये नव्या वेबसीरिज हा आवडीचा आणि गप्पांचा विषय झाला आहे. मात्र रात्रंदिवस या वेबसीरिज एका बैठकीत पाहाण्याची सवय अनेकांसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या तक्रारींना निमंत्रण देणारी ठरत आहे. निद्रानाश ही यातील प्रमुख तक्रार असल्याचे निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञ नोंदवत आहेत.

गेल्या वर्षभरापासून करोना महासाथीमुळे अनेक जण घरातून काम करत आहेत. कामाच्या बदललेल्या वेळा, स्मार्टफोन आणि संगणकावर उपलब्ध (पान २ वर) (पान १ वरून)  असलेले अमर्यादित इंटरनेट, पाहाण्यासाठी उपलब्ध अमर्यादित पर्याय यांमुळे ३५ ते ५० या वयोगटांतील अनेक जण वेबसीरिजच्या व्यसनात गुरफटले आहेत.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निके त कासार म्हणाले, एकटय़ा राहणाऱ्या नागरिकांमध्ये तसेच सर्व वयातील स्त्री-पुरुषांमध्ये वेबसीरिज पाहण्यातून तसेच समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरातून निद्रानाशाची तक्रार वाढली आहे. नव्याने आलेली वेबसीरिज एका रात्रीत बघून संपवणारे लोक आहेत. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित न होणे, त्यातून कार्यक्षमतेवर परिणाम होणे, नैराश्य, चिंता, मंत्रचळ (ओसीडी- ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) असे त्रास दिसतात. अशा वेळी सर्वप्रथम आपल्या वागण्यात काही चुकत आहे हे त्या व्यक्तीला समजण्यासाठी समुपदेशन आणि शेवटच्या टप्प्यात औषधोपचार यांचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. अनेक रुग्ण अस्थिरोगतज्ज्ञ किंवा जनरल फिजिशियन यांच्याकडे दुखण्याचे निदान न झाल्याने त्यांच्या सल्ल्याने मानसोपचारतज्ज्ञांकडे येतात. काही प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थीही या व्यसनाची शिकार होत आहेत.

चालढकल करण्याची वृत्ती..

कोणतेही महत्त्वाचे काम करताना वेबसीरिज पाहाण्याला प्राधान्य देणे आणि काम पुढे ढकलणे ही प्रवृत्ती वाढत आहे. त्यातून जबाबदाऱ्या साठत जातात. त्यामुळे ताणतणाव वाढतात. अनेक जबाबदारीच्या पदांवर काम करणाऱ्यांमध्ये हे दिसून आले आहे. त्यातून नोकरीच्या ठिकाणी कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याची उदाहरणे वाढत आहेत.

काळजी कशी घ्याल?

झोपेचे वेळापत्रक कटाक्षाने सांभाळा. कार्यालयीन काम, अभ्यास यांना प्राधान्यक्रम द्या. वेबसीरिज किंवा ऑनलाइन माध्यमांतील कार्यक्रम बघण्याबाबत स्वयंशिस्त पाळा. वेबसीरिज, समाजमाध्यमे यांबाबत समवयीन व्यक्तींचे अनुकरण करू नका.

मानसोपचारतज्ज्ञांची मदत..

अधिकाधिक दर्शकांना आपल्या मालिकांत गुरफटून घेणे ओटीटी माध्यमांचे मुख्य लक्ष्य असल्याने रात्रभर जागून वेबसीरिज पाहून संपवणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्याबरोबरीने दारू, सिगारेट यांसारखी व्यसनेही जवळ के ली जात आहेत. त्यातून मान-पाठदुखी, नैराश्य, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, व्यावसायिक आघाडीवर कामाचा आळस अशा अनेक तक्रारी घेऊन नागरिक डॉक्टर आणि मानसोपचारांची मदत घेत आहेत.