श्रद्धा-अर्जुनच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’चा फर्स्ट लूक

‘दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम’

half girlfriend

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपट आणि त्याच्याशी निगडीत विविध चर्चांना सध्या उधाण आले आहे. नुकताच या चित्रपटातील अर्जुन आणि श्रद्धाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. याआधीही चित्रपटाचे काही पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. पण, या पोस्टरवर झळकणारे श्रद्धा आणि अर्जुन प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. पोस्टर पाहताक्षणी राहून राहून आठवतो तो म्हणजे ‘आशिकी २’ हा चित्रपट. या चित्रपटाच्या पोस्टरशी काहीसा मिळताजुळता असा हा ‘हाफ गर्लफ्रेंड’चा पोस्टर अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

या पोस्टरमध्ये अर्जुन-श्रद्धा पाठमोरे उभे असून, त्यांनी एकमेकांचे हात पकडल्याचे पाहायला मिळतेय. दोघांचेही मिटलेले डोळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता ते जणू काही स्वप्ननगरीतच रममाण झाल्याचे दिसते. या पोस्टरवर पाहायला मिळणारी श्रद्धा कपूर अनेकांचीच मनं जिंकतेय. तर, अर्जुनचा एकंदर लूक पाहता तरुणींची मने जिंकण्यासाठी तोही सज्ज असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे या पोस्टरवरील टॅगलाइनही फार विचार करुन देण्यात आली असून, ही टॅगलाइन प्रत्येकालाच आपलीशी वाटतेय. त्यामुळे ‘दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम’ ही टॅगलाइन येत्या काही दिवसांमध्ये अनेकांच्याच स्टेटस अपडेटमध्ये पाहायला मिळाली तर त्याचे नवल वाटू नये. दरम्यान, हा पोस्टर प्रदर्शित करण्यापूर्वी चित्रपटातील श्रद्धाचा लूकही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. श्रद्धाचा हा स्पोर्टी लूक आणि बास्केट बॉल कोर्टवरील तिचा वावर विशेष चर्चेत आला.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ १९ मे २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण न्यूयॉर्क, केपटाऊन, दिल्ली आणि बिहारमध्ये करण्यात आले आहे. चित्रपटामध्ये बास्केटबॉल या खेळाचे फार महत्त्वाचे स्थान असून, चित्रपटातील भूमिकेसाठी अर्जुनने चक्क एनबीएच्या खेळाडूंकडून बास्केटबॉलचे धडे गिरवले आहेत. प्रसिद्ध लेखक चेतन भगतच्या काही गाजलेल्या पुस्तकांपैकी एक असणाऱ्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या पुस्तकावर चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. याआधीही चेतन भगतच्या पुस्तकांचा आधार घेत बॉलिवूडमध्ये ‘काय पो चे’ आणि ‘२ स्टेट्स’ हे चित्रपट बनवण्यात आले होते.

shraddha-story_647_032717061529

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Half girlfriend first look released shraddha kapoor and arjun kapoor new poster