scorecardresearch

‘हाफ गर्लफ्रेंड’मध्ये श्रद्धा-अर्जुनमध्ये दुरावा

‘मैत्रीपेक्षा अधिक आणि प्रेयसीपेक्षा कमी’

‘हाफ गर्लफ्रेंड’मध्ये श्रद्धा-अर्जुनमध्ये दुरावा
‘हाफ गर्लफ्रेंड'चे नवे पोस्टर प्रदर्शित

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातील नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि श्रद्धाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या पोस्टरमधून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. आता पुन्हा एक नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या नव्या पोस्टरमधून चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आली आहे. तसेच ‘मैत्रीपेक्षा अधिक आणि प्रेयसीपेक्षा कमी’ या आशयाची टॅगलाइन या पोस्टरवर दिसते. आधी प्रदर्शित झालेल्या पोस्टरपेक्षा श्रद्धा आणि अर्जुनची एक वेगळी झलक या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. यापूर्वीच्या पोस्टरमध्ये एकमेकांत मग्न दिसलेल्या जोडीची ताटातूट होत असल्याचा भास नव्या पोस्टरमधून निर्माण होतो. चित्रपटाचा ट्रेलर १० एप्रिलला प्रदर्शित होणार असून, १९ मे २०१७ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘हाफ गर्लफ्रेंड’चा हा पोस्टर अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून, त्याच्या नव्या पोस्टरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

या पूर्वीच्या पोस्टरमध्ये अर्जुन-श्रद्धा एकमेकांचे हात पकडून पाठमोरे उभे असल्याचे दिसले होते. दोघांचेही मिटलेले डोळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता ते जणू काही स्वप्ननगरीतच रममाण झाले आहेत, असे वाटत होते. पण आता या नव्या पोस्टरमध्ये हे दोघेही विभक्त होताना दिसत आहेत. श्रद्धा आणि अर्जुन या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. अर्जुन आणि श्रद्धा यांच्या पोस्टरला सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सध्या ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. या जोडीला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच समजणार असले तरी पोस्टरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आगामी ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद चित्रपटाच्या यशासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल.

यापूर्वी श्रद्धा कपूर ‘ओके जानू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘आशिकी २’ या चित्रपटातून अल्पावधीत श्रद्धाने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा प्रवास कायम ठेवण्यासाठी तिला आगामी चित्रपटाबद्दल नक्कीच अपेक्षा असेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-04-2017 at 13:32 IST

संबंधित बातम्या