Hansika Motwani and Sohael Khaturiya Divorce: फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानीचा घटस्फोट झाला आहे. हंसिका मोटवानी व सोहेल खतुरिया यांचा तीन वर्षांचा संसार मोडला आहे. मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने आज (११ मार्च रोजी) हंसिका व सोहेलचा घटस्फोट मंजूर केला.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, दोघांनीही परस्पर सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. खरं तर काही महिन्यांपासून हे दोघे एकत्र राहत नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हंसिका तिच्या आईकडे राहायला गेली होती, तर सोहेल त्याच्या कुटुंबाबरोबर राहत होता. लग्नानंतर सुरुवातीला ते सोहेलच्या घरात राहत होते, नंतर त्यांनी वेगळं घर घेतलं होतं. या घरातील गृहप्रवेशाचे फोटो हंसिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं, लग्नाचे फोटो हटवले

पहिल्यांदा जेव्हा सोहेल व हंसिका यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या, तेव्हा सोहेलने हे वृत्त फेटाळले होते. तर हंसिकाने मात्र याबद्दल बोलणंच टाळलं होतं. अशातच हंसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरून लग्नाचे सर्व फोटो हटवले. सोहेलला अनफॉलो केलं आणि तिचे आडनाव बदलले. त्याचबरोबर सोहेलनेही तिला अनफॉलो केलं. नंतर या दोघांमध्ये बिनसल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं.

Award Banner

३ वर्षांपूर्वी जयपूरमध्ये केलेलं लग्न

हंसिका व सोहेलने ४ डिसेंबर २०२२ रोजी जयपूरमधील मुंडोटा किल्ल्यावर थाटामाटात लग्न केलं होतं. विशेष म्हणजे, त्यांच्या लग्नाचे सगळे सोहळे एका रिअॅलिटी डॉक्युमेंटरी सीरिजमध्ये शूट करून ते ओटीटीवर प्रसारित करण्यात आले होते. सोहेलने पॅरिसमधील आयफेल टॉवरखाली हंसिकाला प्रपोज केलं होतं आणि नंतर त्यांनी लग्न केलं होतं, पण त्यांचं लग्न ३ वर्षेही टिकलं नाही.

Hansika Motwani and Sohael Khaturiya divorce
हंसिका मोटवानी व सोहेल खतुरिया (फोटो- इन्स्टाग्राम)

हंसिकाच्या मैत्रिणीचं सोहेलशी झालेलं पहिलं लग्न

खरं तर हंसिका व सोहेलचं लग्न सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलं होतं. कारण हंसिकाने तिच्या मैत्रिणीचा पती पळवल्याची टीका तिच्यावर झाली होती. सोहेल खातुरियाचं पहिलं लग्न रिंकी बजाजशी झालं होतं. रिंकी व हंसिका खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. महत्वाचं म्हणजे रिंकी व सोहेलच्या लग्नाला हंसिकाने हजेरी लावली होती आणि तिने डान्सही केला होता.

ट्रोलिंगनंतर सोहेलने हंसिकाची बाजू मांडली होती. त्याचं पहिलं लग्न मोडलं, याचा हंसिकाशी कोणताही संबंध नाही. तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं त्याने ठामपणे सांगितलं होतं. हंसिका व सोहेल एकमेकांचे खूप जुने मित्र होते, इतकंच नाही तर ते बिझनेस पार्टनरही होते.

हंसिकाने २००७ मध्ये पदार्पण केलं होतं. तिने अनेक तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलंय.