अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. बिझनेसमन सोहेल खातुरियाबरोबरचा तिचा ३ वर्षांचा संसार मोडला. यानंतर हंसिकाची एक्स वहिनी आणि अभिनेत्री मुस्कान नॅन्सी जेम्स हिने या प्रकरणावर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली आहे. “कोणाच्या तरी पूर्णपणे खोट्या जगाशी माझा संबंध जोडून नका,” म्हणत तिने हंसिकावर टीका केली.
शुक्रवारी मुस्कानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने लोकांना विनंती केली की, तिला दुसऱ्या कोणाच्या आयुष्यातील ड्रामात खेचू नये. स्वतःचा फोटो शेअर करत मुस्कानने विनंती केली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने तिला कोणाच्या तरी पूर्णपणे खोट्या जगापासून दूर ठेवावं. खरं काय ते वेळेनुसार समोर येईलच.
मुस्कानने पोस्टमध्ये काय लिहिलं?
“मी काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना विनंती करते की, प्लीज मला दुसऱ्याच्या आयुष्यापासून दूर ठेवा. तुम्ही मला नेहमीच पाठिंबा दिलाय, त्याबद्दल मी आभारी आहे. पण प्लीज मला कोणाच्या तरी खोट्या जगाशी जोडू नका. माझ्याकडे कोणतेही ‘Paid PR नाही. त्यामुळे येता काळच सत्य समोर आणेल. ‘सगळा वेळेचा खेळ आहे. शांतता, प्रेम आणि कर्म,” असं मुस्कानने लिहिलं.
मुस्कानने या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलं नाही, पण सोशल मीडिया युजर्सनी याचा संबंध हंसिकाशी जोडला आहे. मुस्कान आणि हंसिका यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. मुस्कान व प्रशांत मोटवानीचा घटस्फोट झाला आहे.

मुस्कानने हंसिका व तिच्या आईविरोधात दिलेली तक्रार
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हंसिकाचा भाऊ प्रशांत मोटवानी याची पत्नी मुस्कान नॅन्सी जेम्स हिने हंसिका आणि तिच्या आईविरुद्ध तक्रार दिली होती. ही तक्रार रद्द करण्याची हंसिकाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. डिसेंबर २०२४ मध्ये मुस्कान हंसिका आणि तिची आई ज्योती यांच्यावर हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मुस्कानने आपल्या तक्रारीत असाही दावा केला होता की, सासरच्या जाचामुळे तिला ‘बेल्स पाल्सी’ नावाचा चेहऱ्याचा आजार झाला. हंसिका आणि तिच्या आईच्या सततच्या हस्तक्षेपामुळे वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला. दुसरीकडे तक्रारीत आपलं नाव पाहून धक्का बसलाय, असं हंसिकाने म्हटलं होतं.
मुस्कानने केलेले आरोप
मुस्कानने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं की सासरच्या लोकांकडून महागड्या भेटवस्तू आणि पैशांची मागणी केली जात होती. प्रशांतशी लग्न केल्यावर हंसिका आणि ज्योती यांचा खूप हस्तक्षेप होता, त्यामुळे त्यांच्या नात्यात वाद होऊ लागले. मोटवानी कुटुंबाने तिला तिचा फ्लॅट विकण्यासाठी दबाव टाकला होता, असं आरोपही मुस्कानने केला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, हंसिका आणि ज्योतीने मुंबई सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. एप्रिलमध्ये, त्यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हंसिकाचा घटस्फोट
हंसिकाने सोहेल खातुरियाशी नोव्हेंबर २०२२ मध्ये लग्न केलं होतं. ३ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला आहे. बुधवारी कायदेशीररित्या ते विभक्त झाले.
