Hansika Motwani first post after divorce : अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि उद्योजक सोहेल खातुरिया यांनी लग्नाच्या तीन वर्षांनंतर अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टाने ११ मार्च २०२६ रोजी या जोडीच्या घटस्फोटाला कायदेशीर मंजुरी दिली आहे. दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर हंसिका मोटवानीने पहिली पोस्ट केली आहे. तिच्या ३ शब्दांच्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानुसार, सोहेल व हंसिका यांच्यात लग्नानंतर काही काळातच लाइफस्टाइल आणि वेगळ्या मतांमुळे, सवयींमुळे वाद होऊ लागले होते. अगदी छोट्या गोष्टींवरून होणारे मतभेद टोकाला गेल्यामुळे एकत्र राहणं कठीण झालं होतं. कुटुंब आणि मित्रांनी त्यांचं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही घटस्फोट घेण्यावर ठाम होते.

या घटस्फोटातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हंसिका मोटवानीने सोहेल खातुरियाकडून कोणतीही पोटगी किंवा आर्थिक मदत घेण्यास नकार दिला आहे. तिला हे नातं सन्मानाने आणि शांततेने संपवायचं होतं, असं तिच्या वकिलांनी स्पष्ट केलं.

घटस्फोटानंतर हंसिका मोटवानीने केली पहिली पोस्ट

घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर हंसिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये फक्त तीन शब्द लिहिले आहेत. “Chardi Kala Always” असं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय. नेहमी उत्साहात राहणे, परिस्थिती कशीही असो, अगदी कठीण प्रसंगातही आपला उत्साह, आनंद आणि आशा कायम ठेवणे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवणे आणि कधीही हार न मानणे असे या शब्दाचे अर्थ निघतात. या पोस्टच्या माध्यमातून तिने कठीण काळातही सकारात्मक राहण्याचा संदेश दिला आहे.

hansika motwani first post after divorce
हंसिका मोटवानीची स्टोरी (फोटो- इन्स्टाग्राम)

हंसिका मोटवानी व सोहेल खातुरिया दोघे एकमेकांचे खूप जुने मित्र आणि बिझनेस पार्टनर होते. सोहेलने हंसिकाला आयफेल टॉवरसमोर प्रपोज केलं होतं. त्यांचं लग्न ४ डिसेंबर २०२२ रोजी राजस्थानमधील जयपूर येथील ‘मुंडोटा फोर्ट आणि पॅलेस’ इथे अतिशय शाही थाटात झालं होतं. माता की चौकी, मेहंदी, संगीत, हळद आणि सुफी नाईट अशा विविध कार्यक्रमांनंतर दोघे लग्नबंधनात अडकले होते.

हंसिका व सोहेलचे लग्न ‘Love Shaadi Drama’ नावाच्या डॉक्युमेंटरी सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर Disney+ Hotstar वर रिलीज करण्यात आले होते. पण, दोघांचं नातं टिकू शकलं नाही. लग्नानंतर तीन वर्षांनी अधिकृतपणे घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.