Hanuman Ansh Box Office Collection: भारतीय बॉक्स ऑफिसवर सध्या एक मोठा चमत्कार पाहायला मिळतोय. जिथे ‘टॉक्सिक’ आणि ‘बटवारा १९४७’ सारख्या मोठ्या चित्रपटांची कमाई दिवसेंदिवस घटत आहे, तिथेच ७ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या एका चित्रपटाची कमाई वेगाने वाढतेय. अवघ्या १० लाख रुपयांची ओपनिंग करणारा हा चित्रपट आता कोटींमध्ये कलेक्शन करतोय. हा चित्रपट म्हणजे नीम करौली बाबा यांच्या आयुष्यावर आधारित ‘हनुमान अंश’ आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी करताना दिसतोय. रक्षाबंधनच्या दिवशी या चित्रपटाची एका दिवसाची कमाई ६ कोटींच्या पार गेली आहे.
‘आवारापन २’ आणि ‘टॉक्सिक’च्या क्रेझमध्ये टिकून राहिला हनुमान अंश
१४ ऑगस्ट रोजी ‘बटवारा १९४७’ आणि ‘आवारापन २’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘हनुमान अंश’चे बहुतेक शो चित्रपटगृहांमधून हटवण्यात आले होते. मात्र, आता हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये जोरात चालतोय. पहिल्या दिवशी अवघी १० लाखांची ओपनिंग करणाऱ्या ‘हनुमान अंश’ चित्रपटाची कमाई २२व्या दिवशी तब्बल ६.५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. टॉक्सिकच्या क्रेझमध्येही हनुमान अंश बॉक्स ऑफिसवर टिकून आहे.
हनुमान अंशचे २२ दिवसांचे कलेक्शन
पहिल्या दिवशी १० लाख, दुसऱ्या दिवशी २० लाख, तिसऱ्या दिवशी ३० लाख, चौथ्या दिवशी १० लाख, पाचव्या दिवशी १३ लाख, सहाव्या दिवशी १३ लाख, सातव्या दिवशी १२ लाख, आठव्या दिवशी ४ लाख, नवव्या दिवशी ४ लाख, १० व्या दिवशी ८ लाख, ११ व्या दिवशी ५ लाख, १२ व्या दिवशी ५ लाख, १३ व्या दिवशी ५ लाख, १४ व्या दिवशी ५ लाख, १५ व्या दिवशी १५ लाख, १६ व्या दिवशी ८५ लाख, १७ व्या दिवशी २.२० कोटी, १८ व्या दिवशी १.२५ कोटी, १९ व्या दिवशी २.३५ कोटी, २० व्या दिवशी १.५० कोटी, २१ व्या दिवशी २.१० कोटी, २२ व्या दिवशी ६.५० कोटी रुपये हनुमान अंश चित्रपटाने कमावले. हनुमान अंशने एकूण १८ कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे.
‘हनुमान अंश’चे शोज वाढले
‘हनुमान अंश’ रिलीज झाला, तेव्हा त्याला २५० स्क्रीन्स आणि जवळपास ३५० शोज मिळाले होते. परंतु ‘बटवारा १९४७’ आणि ‘आवारापन २’ रिलीज झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात हा चित्रपट अवघ्या २५ स्क्रीन्स आणि २५ शोजपुरता मर्यादित झाला होता. मात्र, प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे स्क्रीन्सची संख्या पुन्हा वाढवण्यात आली. पहिल्या दिवशी ३५५ शोजवरून सुरू झालेला हा प्रवास २२व्या दिवशी २,८२९ शोजपर्यंत पोहोचला आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईतही मोठी वाढ झाली आहे.
