गेल्या काही दिवसापासून ‘हनुमान अंश’ हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिस गाजवतोय. नीम करोली बाबांवरील आधारित हा चित्रपट आहे. भारतीय प्रेक्षकांकडून मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांसारख्या जगप्रसिद्ध दिग्गजांना प्रेरणा देणाऱ्या या महान संताची कथा आता जगभरातील प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

भारतीय चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर हिंदी भक्तिपर चित्रपट ‘हनुमान अंश’ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी होम्बले फिल्म्सकडे आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी हनुमान अंश हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

‘हनुमान अंश’ची कथा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असून, या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे. भक्तांकडून भगवान हनुमानांचा अवतार मानले जाणारे बाबा ‘महाराज-जी’ या नावानेही प्रसिद्ध होते. भक्तीबरोबरच प्रेम, सेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या शिकवणीसाठीही ते ओळखले जायचे. नीम करोली बाबांचा प्रभाव भारतासह पाश्चिमात्य देशांमध्ये आहे. विशेषतः १९६० आणि १९७०च्या दशकात त्यांच्या आध्यात्मिक प्रभावामुळे अनेक पाश्चिमात्य साधक भारतात त्यांच्या दर्शनासाठी आले होते.

हनुमान अंशचे कलेक्शन

‘हनुमान अंश’ या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ १० लाख रुपयांच्या ओपनिंगनंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली गती पकडली असून, प्रदर्शनाच्या २६व्या दिवसापर्यंत चित्रपटाने ६३.८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या दमदार कथानकाला मिळालेल्या सकारात्मक वर्ड-ऑफ-माउथमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता सातत्याने वाढताना दिसत आहे.

बाबांचे भक्त भारतापासून परदेशापर्यंत जगभरात आहेत. त्यांच्या भक्तांमध्ये जगातील काही प्रभावशाली व्यक्तींचाही समावेश आहे. यामध्ये स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. भारतातही भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कैंची धाम येथे जाऊन बाबांचे आशीर्वाद घेतले आहेत.

१९७४ मध्ये स्टीव्ह जॉब्स महाराज-जींचा शोध घेण्यासाठी भारतात आले होते. त्यानंतर स्टीव्ह जॉब्स यांच्या सल्ल्यानुसार, आयुष्यातील एका कठीण काळात मार्क झुकरबर्ग यांनीही कैंची धामला भेट दिली होती. याशिवाय, ज्युलिया रॉबर्ट्स यांनीही आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल बोलताना नीम करोली बाबा आणि त्यांच्या प्रभावाचा उल्लेख केला आहे.