काहींचे कर्तृत्त्व, सातत्य, लोकप्रियता यांच्या वयाच्या आड कधीच येत नाही. अभिनेता आमिर खानचा विचार केल्यास त्याच्याबद्दलही वरील वाक्य अगदी तंतोतंत खरे ठरते. आज १४ मार्चला तो वयाची ५२ वर्षे पूर्ण करतो आहे. पण त्याचा एकूणच उत्साह, आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, नवीन चित्रपटाची निवड करण्याची त्याची पद्धती व त्याच चित्रपटामध्ये झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, त्या चित्रपटाच्या यशापयशाबाबत कमालीची जागरुकता हे सगळं पाहता तो वयाने व अगदी विचारानेही तिशीच्या आसपासचा वाटतो.

चित्रपट निवडण्याचा दृष्टिकोन
आमिर खान म्हटलं की, रसिकांच्या एका पिढीला ‘कयामत से कयामत तक’ पटकन आठवणारच. आमिर तेव्हा अगदीच महाविद्यालयीन विद्यार्थी वाटत होता, तो हिंदी चित्रपटाच्या ‘नायकाच्या वाटचाली’त कितपत टिकेल अशी उगचच शंका होती. शिवाय तो निर्माते ताहिर हुसेनचा पुत्र, त्यामुळे ‘स्टार सन्स’सारखे त्याचे तसे आकर्षण नव्हते. याउलट मन्सूर खान हा मसालेदार/ मनोरंजक अशा ‘कारवाँ’, ‘प्यार का मौसम’, ‘यादो की बारात’ वगैरे चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसेन यांचा सुपुत्र, त्यामुळे त्याला भेटण्यात विशेष रस होता. अर्थात, ‘कयामत से कयामत’मध्ये झळकला व तात्कालिक युवा पिढीने आमिर व जुही चावला या दोघानाही पसंत केले. यानंतरचे त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. पण, आमिरने हार मानली नाही. त्याने लगान, तारे जमीं पर, पीके, ३ इडियट्स यांसारख्या चित्रपटातून आणि अगदी दोन महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या त्याच्या दंगलने बॉलीवूडला एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवले. आमिरच्या प्रत्येक चित्रपटांमधून त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. चित्रपटाचे कथानक, त्याची मांडणी, त्याती कलाकार, दिग्दर्शन यामध्ये सर्वार्थाने हे चित्रपट वेगळे ठरतात.

अभिनय आणि परिपक्वता
आशुतोष गोवारीकरच्या ‘बाजी’त भूमिका साकारताना आमिर खान परिपक्व झाल्याचे दिसले. त्यानंतरच ‘लगान’पासून निर्माता म्हणून तो उभा राहिला, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या या कलाकृतीने ऑस्करच्या अंतिम फेरीत विदेशी चित्रपटाच्या नामांकनापर्यंत मजल मारली. त्या क्षणापासून आमिरला प्रतिष्ठा प्राप्त झाली. तो अत्यंत परिपक्व व गंभीर असा सिनेमावाला म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘तारे जमीं पर’ या चित्रपटापासून व दिग्दर्शनात उतरताना ऑप्टिझन या विकारावर कथारचना केली. अशा टप्प्यांमुळे आमिर खानबाबतची विश्वासार्हता वाढीला लागली.

आमिरची सर्वात मोठी कमाई
तो जे करतो ते परिपूर्णतेचा ध्यास घेऊनच केलेले असते आणि त्याने सादर केलेली कलाकृती एकदा पाहायलाच हवी, असा त्याच्याबाबतचा विश्वास वाढीला लागला की ही त्याची सर्वात मोठी मिळकत ठरते.  त्यामुळेच तर ‘छोट्या पडद्या’वर त्याने साकारलेल्या ‘सत्यमेव जयते’कडे सामाजिकदृष्ट्या पाहिले गेले व त्याने त्यातही बाजी मारली. चित्रपटाच्याही पलिकडे जाऊन आमिर खान या व्यक्तिमत्वाशी स्वतःची ओळख व ताकद आहे, हे यातून दिसून येते.
आमिर समाजाशी खूपच जोडला गेला आहे, हे विविध घटनांतून सिद्ध होत गेले. म्हणूनच तर तो अन्य खान हिरोंपेक्षा खूप वेगळा व वरचढ ठरतो.