बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस. बॉलिवूडचे शहेनशहा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण परिवारासोबत मालदीवला गेले आहेत. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. पण त्यानंतर ते बदलून अमिताभ ठेवण्यात आले. अमिताभ म्हणजे असा प्रकाश जो कधीही कमी होत नाही. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. अमिताभ आणि जया बच्चन यांना श्वेता नंदा आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत.

अमिताभ बच्चन हे स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आहेत. बिग बींची मोठी मुलगी श्वेता नंदा हिने प्रसिद्ध व्यावसायिक निखिल नंदा याच्याशी विवाह केला असून तिला दोन मुलं आहेत. तर अभिषेकने माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याशी लग्न केले असून त्यांना आराध्या ही मुलगी आहे.

आपल्या दोन्ही मुलांमध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता संपत्तीवर त्यांचे समान अधिकार असतील, या बिग बींच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले. त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दरम्यान, अमिताभ यांच्या या निर्णयानंतर त्यांची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. खरंतर, बिग बींची संपत्ती किती आहे याबाबत कोणतीच अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पण, त्यांच्या संपत्ती विषयी ‘राजस्थान पत्रिका’ या संकेतस्थळाने काही माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांची संपत्ती जवळपास ३६०० कोटी रुपये इतकी असल्याचे कळते. सध्या त्यांची वार्षिक कमाई १०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

अमिताभ यांचा पहिला चित्रपट, पहिले मानधन आणि सध्या आकारत असलेले मानधन
‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांना १००० रुपये मानधन मिळाले होते. पण त्यानंतर त्यांच्या मानधनाचा आकडा लाखात आणि नंतर कोटींमध्ये गेला. आता ते प्रत्येक चित्रपटासाठी जवळपास १० कोटी रुपये इतके मानधन घेतात, असे समजते. प्रत्येक जाहिरातीसाठी ते जवळपास पाच कोटी रुपये मानधन घेतात. टेलिव्हिजनमधूनही अमिताभ यांनी चांगलीच कमाई केली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध शोच्या सूत्रसंचालनासाठी अमिताभ सात कोटी रुपये मानधन घ्यायचे असेही म्हटले जाते.

त्यांच्या घराविषयी….
अमिताभ यांचे ‘जलसा’ आणि ‘प्रतीक्षा’ हे दोन बंगले आहेत. पूर्वी ते त्यांच्या आई-वडिलांसह प्रतीक्षा बंगल्यावर राहत होते. मात्र, गेली काही वर्षे ते आपल्या कुटुंबासह जलसामध्ये राहत आहेत. प्रतीक्षा बंगल्याची किंमत १६० कोटी रुपये इतकी असल्याचे म्हटले जाते. तर जलसाची किंमत याहूनही जास्त असल्याचे कळते. या व्यतिरिक्त त्यांनी जुहू येथे आणखी दोन घरे घेतली आहेत. यासोबतच त्यांनी जलसाच्या मागे एक प्लॉट विकत घेतला असून त्याची किंमत ५० कोटी रुपये आहे.

अमिताभ यांच्याकडे गाड्या किती?
बिग बींकडे असलेल्या गाड्यांविषयी जाणून तुम्हाला धक्काच बसेल. त्यांच्याकडे तीन-चार नव्हे तर तब्बल ११ गाड्या आहेत. यात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्श, लेक्सस, फॅन्टम यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त त्यांनी शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक केल्याचे कळते.