२००७ साली ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनेत्री दीपिका पदुकोणने या चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ओम शांति ओम’, ‘बचना ऐ हसीनो’, ‘कॉकटेल’, ‘राम-लीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ या आणि अशा बऱ्या चित्रपटांमधून दीपिकाने भूमिका साकारल्या आहेत. तिचे निखळ हास्य आणि निरागस सौंदर्य चाहत्यांना आजही भुरळ पाडत आहे. आज म्हणजेच ५ जानेवारीला बी टाऊनच्या या मस्तानीचा वाढदिवस आहे. वयाच्या ३१ व्या वर्षात पदार्पण करणारी दीपिका सध्या भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातही नावाजली जात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार कमी वेळात प्रसिद्धी आणि यश संपादन करणाऱ्या काही अभिनेत्रीमध्येही दीपिकाचे नाव घेतले जाते. अभिनय क्षेत्रात कामाप्रती असणारी निष्ठा आणि समर्पण या गोष्टींवर अगदी सुरुवातीच्या काळापासून भर देणाऱ्या दीपिकाच्या वाट्याला सहजासहजी यश मिळाले असे नाही.
सध्याच्या घडीला दीपिकाचे नाव सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. एक मॉडेल म्हणून सुरु झालेला तिचा प्रवास आज एका यशस्वी अभिनेत्रीच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. ‘ये जवानी है दिवानी’, ‘पिकु’, ‘कॉकटेल’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटांमधून तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. अशी ही दीपिका पदुकोण सध्या तिच्या हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाद्वारे दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सध्या या चित्रपटाच्याच चर्चा सर्वत्र रंगत आहेत. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली दीपिका तिच्या अदांनी हॉलिवूडकरांनाही घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे असेच म्हणावे लागेल. पण, चित्रपट आणि त्याद्वारे मिळणारे यश संपादन करण्याआधीही दीपिकाने काही जाहिरातींमध्ये काम केले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? फक्त जाहिरातीच नाही, तर ती काही फॅशन शो मध्येही सहभागी होती. दीपिकावर चित्रीत या जाहिराती आणि गाण्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेही असतील.
‘क्या आप क्सोजअप करते है….’ ही ओळ आताही तितकीच गाजते खरी. ‘क्सोजअप’ टुथपेस्टची ती जाहिरात आठवली का तुम्हाला… त्या जाहिरातीमध्ये ती जी मुलगी दिसत आहे ती दुसरी कोणी नसून दीपिकाच आहे. फक्त याच नाही, तर अशा बऱ्याच जाहिराती आहेत ज्यामध्ये दीपिका झळकली होती. त्यापैकीच काही निवडक जाहिरातींची झलक पाहा दीपिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने..