बाबा या एका शब्दांत सारं काही सामावलं आहे. जशी आई मायेची सावली असते, तसंच बाबा हा आधाराचा वटवृक्ष असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जितकं आईला महत्त्व आहे, तितकचं वडिलांनादेखील आहे. आपली दु:ख मनात ठेवून कायम मुलांसाठी, कुटुंबासाठी चेहऱ्यावर हसू फुलवतो, त्या वडिलांचे आभार मानण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. जून महिन्याचा तिसरा दिवस हा खास वडिलांच्या हक्काचा दिवस आहे. या दिवशी अनेक ठिकाणी फादर्स डे साजरा केला जातो. त्यामुळे आजहीदेखील सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या वडिलांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यातच मराठी दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडेंनीदेखील त्यांच्या वडिलांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
“माझ्या सिनेमात अनेक कलाकारांनी काम केलय.. या ७५ वर्षांच्या कलाकाराने सुध्दा”मुळशी पॅटर्न”मधे एका शेतकऱ्याचं काम केलय.पहिल्याच टेक ला शाॅट ओके, अजुन एक टेक घ्यायचा का.?असं विचारलं तर म्हणाला ओ तरडे,हाडाचा शेतकरी आहे मी,शेतात “बी” एकदाच पेरायचं असतं आणि कसं पेरलय ते उकरून नाय तर उगवून आल्यावरच बघायचं..त्या कलाकाराचं नाव ह.भ.प विठ्ठल किसन तरडे..”बाप तो बाप होता है”, असं कॅप्शन देत प्रविण तरडे यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, प्रविण तरडे यांनी शेअर केलेल्या फोटोपेक्षा त्यांनी दिलेल्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे लोकप्रिय ठरलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये प्रविण तरडे यांच्या वडिलांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये या चित्रपटाची चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे.