गेल्ल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडवर वर्चस्व टिकवून ठेवलेल्या शाहरुख खानचा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत कधी तरी उतरेल, हा विचारही त्याच्यासाठी स्वप्नवतच असावा. त्यामुळे ‘ऑस्कर’साठी नाही तर कमीत कमी ‘ऑस्कर’च्या लायब्ररीत ‘हॅप्पी न्यू इअर’सारख्या टुकार चित्रपटाच्या पटकथेचा समावेश झाल्याबद्दल शाहरुख आणि टीमला कोण आनंद झाला आहे. शाहरुखचा आणि दिग्दर्शक म्हणून फराह खानचा हा सर्वात वाईट चित्रपट आहे. तरीही चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरात साडेतीनशे कोटींचा व्यवसाय केला आहे हे आश्चर्य फिके  पडावे की काय.. अशी त्याची ‘ऑस्कर’वारी झाली आहे.  
फराह खानने दिग्दर्शित केलेल्या ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाने शाहरुखला यशराज बॅनरच्या बाहेर पहिला यशाचा हात दिला होता. त्यामुळे पुन्हा एकदा फराह आणि दीपिका यांनाच बरोबर घेऊन त्याने ‘हॅप्पी न्यू इअर’ची मोट बांधली खरी. यशाच्या सगळ्या खोटय़ा कौतुकात ‘हा आजवरचा सर्वात वाईट चित्रपट आहे’, ही अभिनेत्री जया बच्चन यांनी दिलेली एकच प्रतिक्रिया बोलकी होती. आणि तरीही या चित्रपटाची पटकथा ‘ऑस्कर’ लायब्ररीत जतन करण्यासाठी मागितली गेली आहे. पण, ‘ऑस्कर’ लायब्ररीकडून बॉलीवूडला असलेला हा पहिला आश्चर्यकारक धक्का नाही आहे. मार्च महिन्यात आलेला प्रभुदेवा दिग्दर्शित ‘आर. राजकुमार’ हा तद्दन गल्लाभरू चित्रपट होता. ‘साडी के फॉल सा’, ‘गंदी बात’सारख्या गाण्यांची रेलचेल असणाऱ्या या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे भरपूर गल्ला जमवला. पण, याही चित्रपटाची पटकथा अभ्यासण्यासाठी ‘ऑस्कर’ लायब्ररीकडून मागवण्यात आली. मुळात, प्रभुदेवाने या चित्रपटासाठी पटकथा लिहिली होती का, याचाच शोध घ्यावा लागेल.
करण जोहरचा ‘कभी अलविदा ना कहना’, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘सलाम नमस्ते’, विपुल शहांचा दणाणून आपटलेला अक्षय कुमार-ऐश्वर्या राय आणि आदित्य रॉय कपूर यांचा ‘अॅक्शन रिप्ले’, सुभाष घईंचे दिग्दर्शन म्हणून खूप चर्चेत असलेला आणि सलमान खान-कतरिना कैफ अशी हिट जोडी असूनही पार झोपलेला ‘युवराज’ अशा अनेक चित्रपटांच्या पटकथा ‘ऑस्कर’ लायब्ररीत जतन आहेत. त्यातल्या त्यात आशुतोष गोवारीकर यांचा ‘खेलेंगे हम जी जान से’ असेल किंवा संजय लीला भन्साळी यांचा ‘गुजारिश’ असेल, त्यांच्या पटकथा ‘ऑस्कर’ लायब्ररीकडून मागवल्या गेल्या हे समजण्याजोगे आहे. मात्र, आशयाचे सोडा ज्या चित्रपटांवर कडाडून टीका झाल्यात अशा चित्रपटांच्या पटकथा जतन करण्यामागचे कारण काय असू शकेल? मुळात, या ‘ऑस्कर’ लायब्ररीतील चित्रपटांच्या पटकथा अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करून दिल्या जातात. १९१० पासून आत्तापर्यंत ११ हजार चित्रपटांच्या पटकथा या लायब्ररीत अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. म्हणजेच चांगल्याबरोबर वाईट चित्रपटाची पटकथा कशी असू शकते, याचा अभ्यास म्हणून या पटकथा मागवल्या असाव्यात. आम्हा बॉलीवूडजनांना मात्र असे नाही तर तसे ‘ऑस्कर’ नाव लागले याचेच कौतुक आहे!