Apoorva Mukhija : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रिबल किड नावाने ओळखली जाणारी अपूर्वा मखिजा कायमच कुठल्या तरी वादांमध्ये अडकत असते. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओत तिने एक वेलनेस प्रॉडक्ट कसं पीसीओडीच्या उपचारांसाठी महत्त्वाचं आहे हे सांगितलं होतं. ज्यावरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आता तिने असं वर्तन केलं आहे ज्यामुळे ती आणखी एका वादात सापडली आहे. तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती हातात असलेला पवित्र गंडा कापून टाकताना दिसते आहे. यावरुन आता तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. अपूर्वावर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप होतो आहे.

काय आहे प्रकरण ?

अपूर्वाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती सांगते की ती कोचेला या ठिकाणी चालली आहे. कोचेला हा एक म्युझिक फेस्टिव्हल आहे. तिने हा व्हिडीओ चाहत्यांसाठी केला आहे. ती तयार होत असताना कशी तयार होते आहे हे देखील लोकांना दाखवते आहे. मी कुठले बूट घालणार आहे, कुठले कपडे घालणार आहे? हे देखील अपूर्वा लोकांना दाखवते आहे. अचानक अपूर्वा कात्री घेऊन येते आणि तिच्या हातात असलेला कलेवा म्हणजेच पवित्र गंडा कापून टाकताना दिसते. त्यानंतर म्हणते एका पंडिताने मला धागा हातातून काढू नकोस असं सांगितलं होतं. आता मी मरणार तर नाही ना? असं म्हणत ती हा धागा कापून टाकते. कोचेलाच्या मधे कुणीही येणार नाही हा धागाही नाही. त्यामुळे मी हा धागा कापून टाकते आहे असं अपूर्वा म्हणताना दिसते आहे. नेमक्या याच कारणामुळे वाद निर्माण झाला आहे. अपूर्वाने हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर होतो आहे.

लोकांनी व्हिडीओवर कमेंट करत अपूर्वाला सुनावलं

लोकांनी अपूर्वाच्या व्हिडीओजवर कमेंट करत तिला खडे बोल सुनावले आहेत. एका युजरने म्हटलं आहे की हा गंडा किंवा धागा तुला कापायचा होता तर घातलास कशाला? आणखी एका युजरने म्हटलंय की मी देखील पवित्र गंडा हातात बांधते, पण मी तो कधीही काढत नाही. अपूर्वाने देवाचा आणि लोकांच्या धार्मिक भावनांचा अपमान केला आहे. म्युझिक फेस्टिव्हलला जाण्यासाठी कलेवा कापण्याची गरज काय होती? असाही प्रश्न एका युजरने केला आहे. आज हिने धागा कापला आहे आता हिचा आणखी एक व्हिडीओ येईल कोचेला ऐवजी मी रुग्णालयात कशी पोहचले ते सांगणारा. असं म्हणत आणखी एका युजरने तिची खिल्ली उडवली आहे. दुसरीकडे एका युजरने म्हटलं आहे हिंदू धर्मातला गंडा महत्त्वाचा आहे की तुझा म्युझिक फेस्टिव्हल? तू हिंदू धर्माचा अपमान केला आहेस.

Apoorva-Mukhija
अपूर्वा मखिजा पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. (फोटो-फेसबुक पेज-अपूर्वा मखिजा)

कोण आहे अपूर्वा मखिजा?

अपूर्वा मखिजा सोशल मीडियावर अपूर्वा ‘द रिबल किड’ या नावाने ओळखली जाते. अपूर्वाचे इन्स्टाग्रामवर २.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर ५ लाख सबस्क्रायबर आहेत. करोना काळातील इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकून ती प्रसिद्धीस आली होती. मुळची नोएडाची असलेल्या अपूर्वाने मणिपाल विद्यापीठ, जयपूर येथून शिक्षण पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर अपूर्वाकडे आज गुगल, ॲमेझॉन, मेटा, स्विगी, मेबेलिन असे आंतरराष्ट्रीय ब्रँड आहेत. २०२३ मध्ये तिने अभिनय क्षेत्रातही पदार्पण केले होते.

Apoorva-Mukhija
अपूर्वा मखिजा आणि वादांचं जुनं नातं आहे. (फोटो-फेसबुक पेज, अपूर्वा मखिजा)

वादांशी आहे अपूर्वाचं जुनं नातं

अपूर्वा मखिजा आणि वाद हे समीकरण ठरलेलं आहे. कोविड १९ च्या दरम्यान तिने एक इन्स्टाग्राम व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. मात्र ती कायम शिवराळ भाषेत बोलत असते त्यामुळे अनेकदा वाद होतात. तिला तिच्या भाषेमुळे अनेक वादांना सामोरं जावं लागलं आहे. इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमातही तिने स्त्रीच्या गुप्तांगाबाबत आणि पुरुषांच्या गुप्तागांबाबत बेधडक वक्तव्यं केली होती. ज्यावरुन तिच्यावर टीकेचा भडीमार झाला. तिच्या विरोधात दिल्लीमध्ये गुन्हाही दाखल झाला होता. तिचा एक व्हिडीओही समोर आला होता ज्यात ती प्रेक्षकांशी वाद घालताना दिसली होती. त्यामुळे अपूर्वा मखिजा आणि वाद हे नातं जुनंच आहे.