scorecardresearch

विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना थोडंसं दडपण आहे – हार्दिक जोशी

“तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” मालिकेतील एका नव्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

hardik joshi, tujha majha sansarat ani kay hav,
त्याने एक वेगळी भूमिका साकारतानाचा अनुभव सांगितला आहे.

महाराष्ट्राच्या मातीत कसून तयार झालेला रांगडा मर्द हार्दिक जोशी म्हणजेच झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतील राणादा आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे. अभिनेता हार्दीक जोशी याच्या राणादा या व्यक्तिरेखेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि राणामुळे हार्दिकला ओळख मिळाली. मालिका संपल्यावर या राणाला प्रेक्षक खूप मिस करत आहेत. पण आता हा राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी एका वेगळ्या व्यक्तिरेखेसोबत पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

हार्दिक एका नवीन भूमिकेसोबत पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. झी मराठी वाहिनीवरील “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” मालिकेतून एका नव्या भूमिकेतून हार्दिक सगळ्यांच्या भेटीला येतोय. त्याच्या या नवीन मालिकेबद्दल आणि भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना थोडंसं दडपण आहे.’

‘ही भूमिका खूपच वेगळीच आहे. मी साकारत असलेला सिद्धार्थ हा एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वाढलेला आहे. कुटुंबीय पारंपरिक असल्यामुळे घरचं वातावरण देखील पारंपरिक आहे. सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल मुलगा आहे आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे’ असे हार्दिक म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘अजूनही प्रेक्षक मला राणा म्हणून ओळखतात आणि त्याच नावाने हाक मारतात. त्यामुळे सिद्धार्थ म्हणून देखील माझी ओळख व्हावी यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यासाठी भूमिकेची देहबोली, दिसणं, बोलणं यासगळ्याकडे मी खूप लक्ष देतोय. राणा हा खूप इमोशनल होता त्याउलट सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना मी माझे १०० टक्के देतो आहे. प्रेक्षक देखील राणा सारखंच सिद्धार्थवर पण प्रेम करतील याची मला खात्री आहे.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-08-2021 at 17:19 IST

संबंधित बातम्या