scorecardresearch

हरिहरन आणि साधना जेजुरीकरांची ‘दूरीयां..’ गझल रसिकांच्या भेटीला

हरिहरन यांनी गायिका साधना जेजुरीकर यांच्या साथीने गायलेली एक सुमधुर गझल नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.

man sadhna jejurikar hariharan
हरिहरन यांनी गायिका साधना जेजुरीकर

मखमली आवाजाचे धनी असलेले गायक अशी ओळख असणारे हरिहरन यांनी जगभरात आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. काळानुरूप संगीतामध्ये होणारे बदल आत्मसात करून आजही ते संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हरिहरन यांनी गायिका साधना जेजुरीकर यांच्या साथीने गायलेली एक सुमधुर गझल नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.

 साधना जेजुरीकर यांची निर्मिती असलेली ‘दूरीयां..’ ही गझल नुकतीच समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकच्या बॅनरखाली अंधेरीतील रेड बल्ब स्टुडिओमध्ये प्रकाशित करण्यात आली. ‘दूरीयां..’बाबत हरिहरन म्हणाले की आजवर मी बऱ्याच गझल्स गायल्या आहेत, पण ‘दूरीयां..’ गाताना एका वेगळय़ा प्रकारचं आत्मिक समाधान लाभलं. या गीतातील शब्दरचना आणि त्याला अनुरूप अशी संगीतरचना यांचा अद्भुत संगम संगीतप्रेमींच्या मनाला भिडणारा असून मला स्वत:ला आनंदाची अनुभूती देणारा ठरला आहे. ही गझल ऐकताना आणि पाहताना रसिकांनाही याची प्रचीती येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ‘दूरीयां..’ ही गझल खऱ्या अर्थाने आजच्या काळातील संगीतप्रेमींना भावणारी असल्याचं सांगत साधना जेजुरीकर म्हणाल्या, रसिकांची आवड लक्षात घेऊन ‘दूरीयां..’ची निर्मिती करण्यात आली आहे. कर्णमधुर संगीतरचनेला दर्जेदार निर्मितीमूल्यांची जोड देऊन सादर करण्यात आलेली ‘दूरीयां..’ ही गझल हरिहरन यांनी आपल्या गायकीने एका वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवली आहे. या गझलच्या निमित्ताने त्यांच्यासारख्या आघाडीच्या गायकासोबत गाण्याची संधी मिळाल्याने खूप आनंदी आहे, अशी भावना साधना यांनी व्यक्त केली.

मदन पाल यांनी लिहिलेली ही गझल संगीतकार कैलाश गंधर्व यांनी संगीतबद्ध केली आहे. या गझलचा व्हिडीओ कैलाश पवार यांनी दिग्दर्शित केला असून प्रमोदकुमार बारी यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. हरिहरन, साधना जेजुरीकर, हरीश वांगीकर आणि ऐश्वर्या माने यांच्यावर या गझलचा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. पिकल म्युझिकच्या युटय़ूब चॅनेलवर उपलब्ध असणाऱ्या ‘दूरीयां..’चे छायाचित्रण प्रतीक बडगुजर यांनी केले असून अक्षय हरिहरन संगीत निर्माते आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 00:02 IST