Harsha Sunny Arrested: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ड्रग्ज तस्करीप्रकरणी एक धक्कादायक कारवाई केली आहे. केरळमधील एका नामांकित सौंदर्य स्पर्धेत उपविजेती ठरलेली आणि सध्या एका खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली २९ वर्षीय तरुणी हर्षा सनी हिला तब्बल ११.८ किलो ‘हायड्रोपोनिक वीड’सह अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत १२ कोटी रुपये इतकी आहे. ती बँकॉकहून एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आली होती.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची नाव हर्षा सनी असं आहे. ती गुरुवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती, असं वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

हर्षा सनी कशी पकडली गेली?

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, हर्षा सनी १० आणि ११ जूनच्या दरम्यानच्या रात्री बँकॉकहून ‘एअर इंडिया’च्या TG-351 या विमानाने मुंबईत आली होती. नियमित तपासणी दरम्यान तिची वागणूक संशयास्पद वाटली, त्यामुळे ‘एअर इंटेलिजेंस युनिट’ आणि सीमाशुल्क विभागाने तिला थांबवलं आणि अधिकाऱ्यांनी तिच्या बॅगेची तपासणी केली. त्यावेळी त्यांना त्यामध्ये हिरव्या रंगाचा पदार्थ असलेली १२ सीलबंद पाकिटं आढळली. ‘एनडीपीएस’ किटचा वापर करून केलेल्या केमिकल चाचणीत तो ‘हायड्रोपोनिक गांजा’ असल्याचं स्पष्ट झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षा एका खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करते. गेल्या वर्षी केरळमध्ये झालेल्या एका सौंदर्य स्पर्धेत तिने भाग घेतला होता. विमानतळावर ट्रॉली बॅगेमध्ये लपवून ठेवलेली हायड्रोपोनिक गांजाची १२ पाकिटं सापडली.

पोलीस या प्रकरणावर काय म्हणाले?

हर्षाने तपासादरम्यान आपण निर्दोष असल्याचा दावा केला. विदेश दौऱ्यात एका व्यक्तीने आपल्याशी मैत्री करून ती बॅग भारतात नेण्यास सांगितली, असं तिने अधिकाऱ्याने सांगितलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हर्षाच्या अटकेनंतर या ड्रग नेटवर्कशी जोडलेल्या इतर लोकांचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचे तार एखाद्या मोठ्या तस्करी नेटवर्कशी जोडलेले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

भारत-नेपाळ सीमेवर घडली अशीच घटना

बुधवारी अशीच एक घटना भारत-नेपाळ सीमेजवळ महाराजगंज जिल्ह्यात घडली. ‘पीटीआय’ (PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराजगंज जिल्ह्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी रुपये किंमत असलेला २.३० किलोपेक्षा जास्त ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त करण्यात आला आहे.

सशस्त्र सीमा दलाच्या असिस्टंट कमांडंट प्रिया यादव यांनी दिलेल्य माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती. एसएसबीच्या जवानांच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी सोनौली सीमा भागातून मोहम्मद इद्रीश (३४) याला अटक केली. तो तामिळनाडूमधील रामनाथपुरमचा रहिवासी असून त्याच्या ताब्यातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तो पायी चालत सीमा ओलांडून भारतात प्रवेश करत होता. त्यावेळी त्याच्या बॅगेत अमली पदार्थ सापडल्याने त्याला अटक करण्यात आली.