Marathi Actor On Tipu Sultan Controversy : टिपू सुलतान हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य दाखवून स्वराज्याचा विचार दिला, त्याचे समकक्ष कार्य टिपू सुलतान यांनीही केले आहे. त्यामुळे त्यांना महाराजांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे, असे विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणाऱ्या विधानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. सपकाळ यांनी केलेल्या विधानाविरोधात राज्यभरातून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यावर आता मराठी अभिनेता अभिजीत केळकरनेसुद्धा पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेता अभिजीत केळकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कामाबद्दलची माहिती देत असतो. तसेच अनेकदा तो विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवरसुद्धा व्यक्त होत असतो. अशातच त्याने सध्या सुरू असलेल्या टिपू सुलतानसंबंधित वक्तव्याच्या प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे.

Award Banner

टिपू सुलतान प्रकरणावर अभिजीत केळकरची प्रतिक्रिया

अभिजीतने इन्स्टाग्रामवर “आज महाराज असते, तर अशांना ‘टिपू’न ‘टिपू’न मारले असते”, अशा मोजक्या शब्दांत मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीसुद्धा कमेंट्सद्वारे त्यांची मते मांडली आहेत. अभिजीतने काही दिवसांपूर्वी ‘मुंब्रा को पूरा हरा कर देना है’, असं विधान करणाऱ्या सहर शेख यांच्या वक्तव्यावरसुद्धा मार्मिक व्हिडीओ शेअर केला होता. आता त्याने टिपू सुलतान प्रकरणावरसुद्धा पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात मालेगावात इस्लाम पार्टीच्या शेखर नसरीन खालिद महापौर यांनी त्यांच्या कक्षात लावलेल्या प्रतिमेने झाली. त्यांनी आपल्या कक्षात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. त्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी जी तुलना केली, त्यामुळे त्या वक्तव्याला वादाची फोडणी मिळाली. त्यावर आता सर्वच राजकीय पक्षांतील नेतेमंडळींची विरोधी वक्तव्ये समोर येत आहेत.