हल्ली मराठी रंगभूमीवर येणारी शंभरपैकी ८० नाटकं ही लग्न, संसार, त्यातील नवरा-बायकोच्या समस्या, भांडणं, घटस्फोट यांभोवतीच फिरताना दिसतात. याचा अर्थ जगातल्या बाकी सगळ्या समस्या, प्रश्न सुटलेयत की काय? की त्यांची दखल घेण्याएवढे ते महत्त्वाचे नाहीत? अशाने मराठी रंगभूमी त्याच त्या चक्रात फिरत राहील नाही तर काय! तर ते असो. आहे ही वस्तुस्थिती आहे. ती स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. फक्त ही लग्नसमस्या नाटकात कशी हाताळलीय एवढाच प्रश्न मग उरतो. आणि तोच काय तो या सगळ्या नाटकांतला फरक असतो. असो. तर याच पठडीतलं आणखीन एक नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे… ‘ही दोस्ती तुटायची नाय…’ लेखक : ओंकार गोखले आणि दिग्दर्शक : सुरज पारसनीस.

या नाटकाची मांडणी आणि सादरीकरण मात्र याच प्रकारच्या इतर नाटकांपेक्षा थोडंसं वेगळं आहे… प्रेक्षकांना धरून ठेवणारं आहे. यात नेहमीसारखी तरुण जोडप्यांतल्या बेबनावाची समस्या नाहीए, तर पन्नाशीला पोहोचलेल्या एका परिपक्व दाम्पत्यातील इतकी वर्षं साचलेल्या भावनिक गाळाचा उद्रेक त्यात आहे. फ्लॅशबॅक तंत्रानं ही गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते. आदित्य आणि सुरभी या विवाह समुपदेशकांसमोर ही केस येते तेव्हा त्यांनाही थोडंसं आश्चर्य वाटतं. त्यांची पहिली मीटिंग ऑनलाईन करण्याचं ठरतं. पण मुळातच काहीशी वेंधळी असलेली मानसी सदावर्ते ही गोष्ट न आकळून चक्क मॅरेज कौन्सेलरच्या ऑफिसमध्येच जाऊन धडकते. त्यामुळे तिच्या नवर्‍याला- शशांकलाही मग तिथं बोलावण्यावाचून पर्याय उरत नाही. त्याला मात्र हे सगळं नको ते झंझट आपल्यामागे लागल्यासारखं वाटत असतं. कारण त्याच्या मते, त्या दोघांत असं काहीही घडलेलं नसतं, की ज्यामुळे त्यांनी घटस्फोट घ्यावा. आणि तोसुद्धा आपल्याहून निम्म्या वयाच्या, जीवनाचा फारसा अनुभव नसलेल्या कौन्सेलरची मदत घेऊन! मात्र, मानसीला काहीही झालं तरी त्याच्यापासून घटस्फोट हवा असतो. कौन्सेलरकडून त्यामागील कारणं शोधण्याच्या प्रयत्नांत त्यांच्या भूतकाळात डोकावलं जातं.

खरं तर मानसी आणि शशांक शाळेत असल्यापासून एकमेकांचे दोस्त असतात. शशांक अतिशय स्मार्ट, तर मानसी काहीशी बुजरी, मागे मागे राहणारी. शशांक तिला अभ्यासात मदत करतो. आणि मग त्यांची दोस्ती हळूहळू घट्ट होत जाते. यथावकाश दोघं मोठे होतात. आणि मग दोघांच्याही मनात ‘कुछ कुछ’ होऊ लागतं. साहजिकच ते लग्न करायचा निर्णय घेतात. लग्नानंतर शशांक आपल्या पत्रकारितेत व्यग्र होतो. मानसी त्याचा संसार सांभाळण्यात आणि अधूनमधून कविता करण्यात स्वत:ला गुंतवते. पंचवीसेक वर्षांचा त्यांचा संसार सुरळीत चाललेला असतो. आणि अचानक मानसीला त्यात काहीतरी कमी जाणवायला लागते. तिला शशांकची बायको याव्यतिरिक्त आपली काही स्वतंत्र ओळख नाहीए याची जाणीव होते आणि तिचं संसारातलं मन उडतं. शशांकला मात्र हे काहीच जाणवत नाही. त्याचं मानसीवर प्रेम असतं. छान संसार चाललेला असतो. आणि अचानक मानसीला हा कसला झटका आलाय तेच त्याला कळत नाही.

कौन्सेलरच्या उत्खननात एक- एक गोष्टी उलगडत जातात. मानसीचं म्हणणं असतं : शशांकचं माझ्यावर प्रेम आहे, पण त्याला माझ्याबद्दल आदर वाटत नाही. मला माझी स्वतंत्र ओळख नसल्यामुळेच हे होतंय. तेव्हा त्याच्यापासून घटस्फोट घेऊन मला माझं स्वतंत्र जग उभं करायचंय; जेणेकरून माझ्याबद्दल शशांकला आदर वाटेल. आणि हे त्याच्यापासून दूर गेल्याशिवाय होऊ शकणार नाही. शशांक तिला परोपरीनं विनवतो, की संसारात राहूनही तुला हे करता येईल. पण मानसीला ते मान्य नसतं. अर्थात अखेर काय होतं, हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच उचित.

लेखक ओंकार गोखले यांनी आजवर काहीशा अस्पर्श राहिलेल्या आणि सहसा कुठल्याही विवाहबंधांत क्वचितच महत्त्व दिल्या जाणा-या मुद्द्याला हात घालून तो ऐरणीवर आणला आहे. अस्मिता, स्वओळख ही हल्ली व्यक्तीचा मूलभूत हक्क म्हणून समोर येत आहे. विशेषत: तरुणाईच्या बाबतीत. आजकाल बरीचशी लग्नं या मुद्द्यावर टकरूनच जमीनदोस्त होतात. मात्र यात कितपत तथ्य असतं आणि त्याला (वाजवीपेक्षा) किती महत्त्व द्यावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. आजच्या समानतेच्या युगात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. आणि ते गैरही नाही. परंतु लग्न, संसार म्हटलं की तडजोडही आलीच. प्रत्येक ठिकाणी ‘मी’च महत्त्वाचा मानून प्रत्येकानं जगायचं ठरवलं तर मानवी संबंध उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. शशांक आणि मानसीच्या बाबतीत हा मुद्दा टोकाला जायचं कारण- शशांकने तिला पुुरुषी मनोवृत्तीनं गृहीत धरणं हे आहे. खरं तर त्या दोघांची व्यक्तिमत्त्वंही दोन टोकांची आहेत. शशांक इतरांच्या बाबतीत म्हणतो तसं मानसीचं व्यक्तिमत्त्व त्या अर्थानं सुमार आहे. तिच्या कविताही सुमार आहेत. परंतु अशा दोन व्यक्तींचं वैवाहिक जीवन सुखाचं होऊ शकत नाही का? तर तसंही नाही. अशा दोन भिन्न व्यक्तिमत्त्वाच्या माणसांचं सहजीवन सुखाचं, प्रेमाधारित नक्कीच होऊ शकतं. त्यासाठी दोघांनीही आपापल्या आणि परस्परांच्या मर्यादा समजून उमजून घ्यायला हव्यात. दुसर्याच्या वेगळ्या गुणांबद्दल आदर असायला हवा, तरच ते नातं गुणदोषांसह परिपूर्ण होऊ शकतं. इथे मानसीचं दु:ख आपल्याला या नात्यात आदर मिळत नाहीए, हे आहे. आणि ते असूच शकतं. आणि शशांकच्या छायेखालून दूर गेल्याशिवाय आपण तो मिळवू शकत नाही, ही तिची धारणाही काही गैर नाही. त्यामुळे एकीकडे तिच्या मर्यादा ओळखूनही तिची तगमग चुकीची वाटत नाही. म्हणूनच हे नाटक प्रेक्षकाला धरून ठेवतं. लेेखक ओंकार गोखले यांनी नेहमीच्या प्रचलित पठडीत नाटकाची मांडणी न करता त्यात नावीन्य आणलं आहे. शशांक-मानसीचं नातं हळूहळू उलगडत नेऊन त्यातले खाचखळगेही त्यांनी तरलपणे मांडले आहेत. अर्थात शशांक हा शेवटी पुरुषच असल्याने लग्नानंतर त्याने मानसीला गृहीत धरणंही त्यात आलं. याचा शेवट असा काही होईल हे मात्र त्याच्यासाठी तर्कापलीकडचं ठरतं. त्यामुळेच मानसीचा हा आत्मशोध त्याच्याकरता धक्कादायक ठरतो. कारण इतका तो मानसीवर भावनिकदृष्ट्या अवलंबून आहे. लेखकानं मानसीची ही आत्मशोधाची कहाणी अलवारपणे हाताळली आहे. यातल्या कौन्सेलर जोडीचं परस्पर नातंही त्यातून उलगडत जातं. त्यांच्या नात्यातही नकळतपणे परिपक्वता येते.

दिग्दर्शक सुरज पारसनीस हे आजघडीला मुख्य धारेतील एक आश्वासक उगवते दिग्दर्शक आहेत असं म्हणायला हरकत नाही. अलीकडच्या त्यांच्या नाटकांतून हे प्रकर्षानं जाणवतं. लग्न या विषयावरील अनेक नाटकांपैकी एक असं या नाटकाचं स्वरूप न राहता ते वेगळं ठरतं ते या दिग्दर्शकीय हाताळणीमुळेच. तरलपणे उलगडत जाणारी एक कहाणी त्यांनी यात मांडली आहे. त्यासाठीची प्रसंग उभारणी, त्यातले भावनिक आरोह अवरोह, पात्रांच्या हालचाली, व्यवहार सहजगत्या व्यक्त होतील हे त्यांनी पाहिलं आहे. यातली गाणीही ओढूनताणून येत नाहीत. प्रत्येक पात्राला ज्याचा त्याचा स्व-भाव देण्यात ते यशस्वी झाले आहेत. लग्नाची चिरपरिचित गोष्ट त्यांनी वेगळ्या पद्धतीनं पेश केली आहे. याबद्दलचे मार्क्स त्यांना द्यावेच लागतील.
नीरज शिरवईकर यांनी नाटकाची अनेकानेक नाट्यस्थळांची मागणी लवचिक नेपथ्यातून पुरविली आहे. तेजस देवधर यांनी यातल्या नाट्यमय प्रसंगांतील ताण प्रकाशयोजनेतून दृगोचर केला आहे. शिवप्रिया सुर्वे यांच्या गीतांना निरद सुमीत यांनी लय-तालाची श्रवणीय जोड दिली आहे. खुशबू जाधव आणि पूजा काळे यांनी गीतांना नृत्याची साथ दिली आहे. कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी पात्रांना वेशभूषेतून ह्य्व्यक्तिमत्त्वह्ण दिलं आहे. विशेषत: ऑनलाईन कौन्सिलिंग करतानाचा आदित्य आणि सुरभीचा पेहराव अतिशय चपखल. शरद सावंत यांच्या रंगभूषेने पात्रांना प्रसंगोपात लवचिकरीत्या ह्य्चेहराह्ण प्रदान केला आहे.

सर्वच कलाकारांची कामं उत्तमच झाली आहेत. शशांक झालेल्या सुमीत राघवन यांनी पत्रकाराचं काहीसं बुद्धिनिष्ठ शिष्ट रूप आणि त्याचवेळी घरच्या आघाडीवरचं घरगुती, हळवं रूप अलवारपणे व्यक्त केलंय. शशांकचा उपजत स्मार्टपणा, पत्रकाराची समतोल बुद्धी, वृत्ती त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्या-वावरण्यातून यथार्थपणे दाखवलीय. मानसीच्या घटस्फोटाच्या हट्टानं हादरलेला शशांक वेगळाच भासतो. शेवटी त्याला झालेली उपरती त्यामुळेच समर्थनीय ठरते. मानसीच्या भूमिकेत चिन्मयी सुमीत तिच्या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पदर उत्कटतेनं दर्शवतात. तिची स्व-ओळखीची तळमळ म्हणूनच खरी आणि अस्सल वाटते. एकाच वेळी शशांकमधील गुंतलेपण आणि त्याचवेळी त्याच्यापासून दूर जाण्याची अपरिहार्यता यांतली तगमग त्यांनी नेमकेपणानं पोहोचवली आहे.

दोघांचं हळूूहळू फुलत जाणारं नातंही या दोघांनी लोभसरीत्या पेश केलं आहे. शुभंकर एकबोटे यांनी आदित्यच्या रूपात मॅरेज कौन्सेलरच्या व्यक्तिमत्त्वातील अपेक्षित ठहराव, आपली भूमिका दुसर्याच्या गळी उतरवण्यातली ठाशीव कळकळ, तसंच इतरही छोट्या छोट्या भूमिकांना न्याय देणं छान जमवलं आहे. सुरभी झालेल्या अमृता बने यांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे.

सुरभीचं मधेच हायपर होणं, तरीही शक्यतो छान समंजस असणं त्यांनी आपल्या भावभावनांच्या संंयमित नियंत्रणातून योग्य प्रकारे पकडलंय. मानसीची आई आणि शीलाची छोटेखानी भूमिकाही त्यांनी वेगळेपणानं समूर्त केलीय. या तिन्ही भूमिका एकच अभिनेत्री साकारतेय असं वाटतच नाही.
एकुणात लग्नाची ही वेगळी गोष्ट प्रेक्षकांना आवडायला हरकत नाही.