प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. पण आता यामुळं त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. चाहते म्हणाल तर ते केवळ सर्वसामान्य लोक नाहीत तर यात सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. तर अभिनेत्री हेमांगी कवीनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

हेमांगीने केकेचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ”मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला! शाळा संपून कॉलेज मधल्या नवनवीन हवेत ‘यारों दोस्ती बडी ही हसीन है आणि पल’ या गाण्यांवर तरंगायला लागलो पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्या सारखं झालं. 90s मधल्या लोकांना कळेल मी काय म्हणतेय ते, काही काही गाण्यांनी, आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं, तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो, time travel सारखं. काल रात्री ते सगळं गोठलं. सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक असा घेऊन गेलास, यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही!” असे कॅप्शन हेमांगीने दिले आहे.

आणखी वाचा : “…तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : “तुझं सर्वात Best Reel…”, जिनिलियाचा शक्ति कपूर यांच्यासोबत धमाल डान्स व्हिडीओवर रितेशची कमेंट चर्चेत

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर काही वेळातच केके त्याच्या टीमसोबत हॉटेलकडे रवाना झाला. ईटाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच केकेने छातीत दुखत असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्याला सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले. जे हॉटेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होते. तेथे डॉक्टरांनी केकेला मृत घोषित केले. सध्या त्याच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे.