मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजलं. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने प्रदीप पटवर्धन यांना पहिल्यांदा भेटण्याचा किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेमांगीने सांगितलं की, ‘मी पहिल्यांदा कुठल्या अभिनेत्याला आताच्या भाषेत ‘सेलिब्रिटी’ला पाहिलं असेल तर ते प्रदीप पटवर्धन होते. कळव्यात कुलकर्णी नावाचे डेंटिस्ट आहेत. अगदी माझ्या घरातील स्वयंपाक घराच्या खिडकी समोर त्यांचं क्लिनिक. दुपारची ४ ची वेळ होती आणि माझ्या आईने चहा करत असताना उंचपुऱ्या देखण्या पुरुषाला क्लिनिकमध्ये जाताना पाहिलं. मला आईने बोलावून घेतलं आणि सांगितलं अगं त्या क्लिनिकमध्ये प्रदीप पटवर्धन गेलेत बहुतेक. मी म्हटलं काही काय? एवढा मोठा माणूस इथं कशाला येईल? आई म्हणाली अगं नाही तेच आहेत. शहानिशा करायला म्हणून मी गेले क्लिनिकजवळ आणि तेवढ्यात क्लिनिकचं दार उघडून एक प्रचंड देखणे व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर चालत आले.’

आणखी वाचा – “हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड” प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंकडून हळहळ व्यक्त

‘पहिला अभिनेता ज्याला मी इतकं जवळून पाहिलं होतं. काळजात धस्स झालं. काय बोलावं काय करावं सुचेना. आठ नऊ वर्षाची मी त्यांना बघून घाबरून पळून आले आणि आईला सांगितलं अगं तेच आहेत! दुसऱ्या दिवशी शाळेत मी सर्वांना खूप गर्वाने ही गोष्ट सांगितली. मग त्यांनतर अनेक वेळा त्यांना त्या क्लिनिकमध्ये जाताना येताना पाहिलं.’

आणखी वाचा – ३८ वर्षांची मैत्री, बँकमध्ये नोकरी अन्…; प्रदीप पटवर्धन यांच्याबद्दल बोलताना विजय पाटकर भावूक

‘खूप वर्षांनी अभिनय क्षेत्रात आल्यावर त्यांच्याबरोबर काम करायची संधी ही मिळाली. जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा हा किस्सा त्यांना सांगितला. मी म्हटलं “मी तुम्हाला पाहिलं होतं लहानपणी” त्यावर पट्या काका म्हणाले “कुणाच्या लहानपणी?”, “माझ्या की तुझ्या?” मी म्हटलं “अहो माझ्या” तर त्यांच्या विशिष्ट अशा शैलीत मानेला झटका देऊन म्हणाले “हा मग ठिके, मी उगाच घाबरलो!” माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही पण घरी आल्यावर कळलं त्यांना काय म्हणायचं होतं! असा मिश्किल, देखणा आणि टायमिंगचा बादशाह पट्या काका उर्फ प्रदीप पटवर्धन! आठशे खिडक्या नवशे दार वरचा तुमचा डान्स म्हणजे ओहोहो! आम्हाला तुमची खूप आठवण येईल’ असे कॅप्शन हेमांगी कवीने दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemangi kavi recalls meeting veteran actor pradeep patwardhan for the first time pns
First published on: 09-08-2022 at 16:23 IST