बॉलीवूडच्या विनोदी चित्रपटांमध्ये ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची, ‘हेरा फेरी ३’ ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाबाबत कोणतीही अपडेट येताच चाहते आनंदी होतात. आता सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी ३’ बद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. सध्या सुनील शेट्टी त्याच्या ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यानच, त्याने चित्रपटाच्या टीझरबाबत अपडेट दिले आहे.

टीझर कधी प्रदर्शित होईल?

अमर उजालाशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, “आम्ही शूटिंग सुरू केले आहे आणि टीझरही शूट केला आहे. आयपीएलदरम्यान हा टीझर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे आणि हो, मी खूप उत्साहित आहे, कारण तीच टीम आहे. हा चित्रपट नेहमीच इतर चित्रपटांपेक्षा वेगळा राहिला आहे.” ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटातील तीन स्टार अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रियदर्शन दिग्दर्शित करत आहेत, ज्यांनी २००० मध्ये पहिला हेरा फेरी बनवला होता.

सुनील शेट्टी शूटिंग सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना म्हणाला, “जेव्हा आम्ही तिघे एकत्र येतो तेव्हा वातावरण मजेदार असते. खरे सांगायचे तर तिथे एक वॉर्निंग देणारा बोर्ड लावला पाहिजे, कारण आम्ही तिघे सोबत असलो की सेटवरील वातावरण बदलते. प्रियदर्शन सर नेहमी सांगतात, जर तुम्हाला मजा करायची असेल तर शॉटनंतर करा.”

‘हेरा फेरी ३’ची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाबद्दल बऱ्याच काळापासून अनेक अफवा आणि विलंब होत होते, पण आता कलाकार आणि दिग्दर्शक एकत्र काम करत आहेत. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अभिनेता सुनील शेट्टी लवकरच सूरज पांचोलीबरोबर ‘केसरी वीर’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘केसरी वीर’ या चित्रपटात सुनील शेट्टी आणि सूरज पांचोली जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत.