बॉलीवूडची बेबो करिना कपूर खान आणि सैफ अली खान हे अखेर आई-वडिल झाले आहेत. करिनाने मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात आज सकाळी साडेसात वाजता बाळाला जन्म दिला. करिना-सैफच्या घरी छोट्या नवाबाचे आगमन झाले आहे. बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे कळते. दरम्यान, बॉलीवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर याने ट्विटरवरून करिनाला बाळ झाल्याची बातमी देत आपला आनंद व्यक्त केला.

आपल्या बाळाच्या जन्मानंतर सैफ म्हणाला की, तुम्हा सर्वांना सांगताना आम्हाला आनंद होत आहे की, आमच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. २० डिसेंबर २०१६ला तैमुर अली खान पतौडीचा जन्म झाला. गेल्या नऊ महिन्यांपासून प्रसारमाध्यमांनी आम्हाला समजून घेतले आणि त्यांनी जो काही पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तसेच, आमचे चाहते आणि शुभेच्छुक यांनी आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचे आभार मानतो. सर्वांना नाताळच्या आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा.. सैफ आणि करिनाकडून तुम्हाला खूप सारे प्रेम.

https://twitter.com/karanjohar/status/811077540903354368

करिना आणि सैफ यांच्या पहिल्या बाळाचे नाव तैमुर असल्याचे आता समोर आले आहे. पतौडी खानदानाला साजेसे असे सैफ-करिनाने त्यांच्या बाळाचे नाव ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी करिनाच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलताना सैफ म्हणालेला की, करिना आणि माझ्या नात्यातील हे प्रतिबिंब आहे. बाळाने आमच्या नात्याला पूर्णत्व मिळाले. आमचे येणारे बाळ काहीसे माझ्यासारखे असेल तर काहीसे तिच्यासारखे असेल. ही खूप छान भावना आहे. मध्यंतरी करिना आणि सैफ त्यांच्या बाळाला सैफिना असे संबोधणार असल्याच्या चर्चा होत्या. करिनाने एका चॅट शो दरम्यान आपल्या बाळाचे नाव सैफिना ठेवणार असल्याचे म्हटले मिश्किलपणे म्हटले होते. पण, सोशल मिडीयावर तिच्या या वक्तव्याला जास्तच गांभीर्याने घेत अनेकांनी तिच्या होणा-या बाळाचा उल्लेख सैफिना असा करण्यास सुरुवात केली होती. सरतेशेवटी सैफ अली खान याने या चर्चांना पूर्णविराम देत आपण आपल्या बाळाला सैफिना म्हणणार नसल्याचे सांगितले होते.

करिनाने तिच्या या गरोदरपणाचा फार सुंदर पद्धतीने आनंद लुटला. आई होणा-या सर्व महिलांसाठी ती एक प्रेरणा बनली होती. गरोदरपणात शेवटच्या महिन्यापर्यंत करिना तिच्या मैत्रिणींसोबत फिरत होती. त्याचसोबत ती तिच्या व्यावसायिक जबाबदा-याही पूर्ण करत होती. काही मासिकांच्या कव्हरसाठी तिने फोटोशूट केले. तसेच, तिने फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकही केला. सैफिनाच्या घरी बाळाचे आगमन होण्यापूर्वी सैफ फारच चिंतेत असल्याची माहिती काही संकेतस्थळांनी दिली होती. एका जबाबदार पतीप्रमाणे त्याने करिनाला आराम करण्यास सांगितले होते. गरोदरपणातही करिना उत्साहित होऊन काम करत होती. त्यामुळेच सैफला तिची काळजी वाटत होती. त्यामुळे त्याने करिनाला काम थांबवण्यास सांगितले होते.