नाटकादरम्यान मोबाइल फोन वाजल्यामुळे कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याच्या काही घटना सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.  अभिनेता सुबोध भावेनं थेट नाटकात काम करणं बंद करण्याचा इशारा दिला. रसिकांना प्रेमाने समजावून सांगण्यासाठी सुबोधने प्रयोग सुरू होण्यापूर्वी चक्क डोअरकीपरचंही काम केलं. इतकंच नव्हे तर आता कलाकार नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांसमोर येऊन त्यांना मोबाइल सायलेंट मोडवर ठेवण्याची विनंती करत आहेत. ही गोष्ट  कलाकारांना सांगावी लागणे लाजिरवाणं नाही का असा प्रश्न लोकसत्ता ऑनलाइनकडून विचारण्यात आला होता. त्यावर ८८% लोकांचा कौल हा कलाकारांच्या बाजूने आला आहे.

‘अशा प्रेक्षकांना सुजाण प्रेक्षक तरी कसे म्हणावे, आणि फोन सायलेंट मोडवर ठेवला तरी फारसं काही बिघडत नाही. त्यामुळे नाट्य कलाकारांनी घेतलेला निर्णय योग्यच म्हणावं लागेल,’ असं मत एकाने व्यक्त केलं आहे तर आपण जबाबदारीने कधी वागणार असा सवाल एकाने उपस्थित केला आहे.

आणखी वाचा : नाटक कसे पाहावे?

नाटकादरम्यान मोबाइल फोनचा व्यत्यत येऊ नये आणि नाटकाचा आनंद रसिकांनाही मनमुराद लुटता यावा, ही बाब पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या लक्षात आणून देण्यासाठी लोकसत्ता ऑनलाइनने ‘#शांतता_नाटक_चालू_आहे’ ही मोहीम सुरू केली आहे. तुम्हीसुद्धा या मोहिमेत सहभागी आणि बदल घडवा.