कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये ‘३७० रुपयांची बिर्याणी’ वसूल करण्याचं वक्तव्य करणाऱ्या हिमांशू जांगराची या संपूर्ण प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. व्हायरल व्हिडीओनंतर प्रणित मोरेने माफी मागितली असून हिमांशूला त्याची नोकरी गमवावी लागली आहे. आता त्यानेही माफी मागत आपण शोमध्ये ती गोष्ट रंगवून सांगितली, असं म्हटलं आहे.

अवघ्या २३ वर्षांच्या हिमांशूला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने कामावरून काढून टाकलं. कामाच्या ठिकाणी त्याचं वागणं आक्षेपार्ह नव्हतं, मात्र जे घडलंय त्यानंतर त्याला कामावरून काढण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. आता हिमांशूने जुनी कंपनी ‘स्टारव्हिक डिझाइन’चे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याने माफी मागितली आणि त्याची बाजू मांडली.

मी जे बोललो ते सगळं खरं नव्हतं – हिमांशू जांगरा

“मी त्या शोमध्ये जी स्टोरी सांगितली, त्यात मी ज्या मुलीबद्दल बोललो तिला मी डेट केलं होतं. आमच्या खूप गप्पा व्हायच्या, आमचं खूप चांगलं बाँडिंग होतं, आम्ही बराच वेळ एकत्र घालवला होता. पण मी तिथे जे बोललो ते सगळं खरं नव्हतं. कारण माझ्याआधी जे लोक बोलत होते, त्यांनी अशाच गोष्टी सांगितल्या होत्या, त्यामुळे मी रंगवून सांगितलं. माझंच नशीब खराब होतं की माझाच व्हिडीओ व्हायरल झाला. आता तर माझ्यावर गुन्हाही दाखल झालाय, खूप वाईट अवस्था झाली आहे. मी खूप मानसिक तणावात आहे. घरच्यांकडे पाहिल्यावर खूप पश्चात्ताप होतोय की मी त्या शोमध्ये का गेलो. मी मान्य करतो की मी चुकीचे शब्द वापरले, त्यासाठी मी माफी मागतो,” असं हिमांशू जांगरा म्हणाला.

मी महिला सहकाऱ्यांशी नेहमीच आदराने वागलोय – हिमांशू जांगरा

“माझ्या हेतू वाईट नाही किंवा लोकांना माझ्याबद्दल जसं वाटतंय तशी माझी मानसिकता नाही. माझ्या महिला सहकाऱ्यांशी मी नेहमीच आदराने वागलोय,” असं हिमांशूने सांगितलं. सुरुवातीला त्याच्या घरात कोणालाही या प्रकरणाची कल्पना नव्हती, परंतु वाद वाढल्यावर त्याच्या कुटुंबीयांना समजलं आणि काकांनी घडलेल्या प्रकाराबद्दल विचारलं. आता मात्र हिमांशूला या शोमध्ये जाण्याचा खूप पश्चात्ताप होतोय.

हिमांशू जांगराचं नेमकं काय म्हणाला होता?

हिमांशू जांगराने प्रणित मोरेच्या शोमध्ये सांगितलं की तो एका मुलीबरोबर डेटवर गेला होता, तिथे त्याने ३७० रुपयांच्या चिकन बिर्याणीचं बिल भरलं. बिर्याणी खाल्ल्यानंतर त्या मुलीने घरी सोडण्याची विनंती केली. पण बिर्याणीसाठी ३७० रुपये खर्च झाले असल्याने ते जवळीक साधून वसूल करायला हवेत. म्हणून त्याने मुलीला घरी सोडण्यास नकार दिला आणि त्याच्यासोबत एका पार्कमध्ये येण्यास सांगितलं. पण ती तिथे यायला नकार देत होती. शेवटी ती त्याच्याबरोबर त्या पार्कमध्ये गेली, तिथे गेल्यावर जवळीक साधण्यासाठी त्याने अंधार व्हायची वाट पाहिली. हिमांशूने हे सांगितल्यावर प्रणित मोरेसह सर्वांनी हसून प्रतिक्रिया दिली होती.