Hindi cinema far behind the times Creative congregation movie sudhuir Mishra ysh 95 | Loksatta

‘हिंदी चित्रपटसृष्टी काळाच्या खूप मागे’

आपल्या मनासारखं काम करायला मिळो वा न मिळो.. आपल्या कलेशी, तत्त्वांशी तडजोड न करता काही सर्जनशील मंडळी शांतपणे आपल्या पद्धतीने चित्रपट करत असतात.

‘हिंदी चित्रपटसृष्टी काळाच्या खूप मागे’
सुधीर मिश्रा

रेश्मा राईकवार

आपल्या मनासारखं काम करायला मिळो वा न मिळो.. आपल्या कलेशी, तत्त्वांशी तडजोड न करता काही सर्जनशील मंडळी शांतपणे आपल्या पद्धतीने चित्रपट करत असतात. जे पटत नाही, त्याबद्दल व्यक्तही होत राहतात. मात्र कुठलीही तक्रार न करता नवे-जुने बदल पचवत ते कार्यरत असतात. १९८३ साली कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’ चित्रपटाची पटकथा लिहिण्यापासून सध्या ओटीटीवर इस्रायली वेबमालिकांचा रिमेक बनवणारे दिग्दर्शक सुधीर मिश्रा हे अशा जुन्या-जाणत्या आणि प्रगल्भ दिग्दर्शकांपैकी एक. ‘फौदा’ या इस्रायली वेबमालिकेवरून प्रेरित असलेल्या ‘तनाव’ या वेबमालिकेचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले आहे. सध्या सोनी लिव्हवर ही मालिका प्रदर्शित झाली आहे. यानिमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलत्या प्रवाहाचा वेध घेताना आपली चित्रपटसृष्टी अजूनही काळाच्या खूप मागे आहे, असं निरीक्षण सुधीर मिश्रा यांनी नोंदवलं.

सुधीर मिश्रा यांनी चित्रपटातून कायम वेगळे विषय हाताळले आहेत. ‘इस रात की सुबह नही’, ‘चमेली’, ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’सारखे चित्रपट देणारे सुधीर मिश्रा सध्या ओटीटीवर रमले आहेत. त्यांनी आधी ‘होस्टेजेस’ या इस्रायली वेबमालिकेचा रिमेक केला. त्यानंतर नेटफ्लिक्सवर ‘सीरियस मेन’ या त्याच नावाने प्रसिद्ध असलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपट केला. आता ते ‘तनाव’च्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांसमोर आले आहेत. ओटीटीमुळे माझ्यासारख्या दिग्दर्शकांना खूप फायदा झाला, असं ते म्हणतात. मुळात आम्ही कधी फॉम्र्युलापट केले नाहीत. त्यामुळे इतर सगळय़ा चित्रपटांप्रमाणेच वेगळं काही सांगू पाहणाऱ्या आमच्या चित्रपटांचाही प्रदर्शित झाल्या झाल्या तीन दिवसांत निकाल लावला जातो. तो चित्रपट लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचायला वेळच मिळत नाही, ओटीटीवर ती भानगड नसते. तिथे प्रेक्षकांना कधीही चित्रपट पाहता येतो, शिवाय तिथल्या प्रेक्षकांना पठडीबाज चित्रपट नको असल्याने प्रयोग करायला वाव आहे, असं त्यांनी सांगितलं. इतक्या वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी निवडकच चित्रपट केले, त्याचं कारण स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘आमच्याकडे सांगण्यासारख्या गोष्टी खूप होत्या, पण इंडस्ट्रीला आम्ही त्या लोकांना सांगाव्यात असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे आता ओटीटी माध्यमावर आम्हाला वेगवेगळय़ा विषयांवरचे चित्रपट करण्याची संधी आहे आणि तेवढा निर्मितीखर्च देण्याची त्यांची तयारीही असते’.

कोणतीही एक सामाजिक-राजकीय बाजू घेण्यात रस नाही..

माणूस म्हणून तुमची राजकीय-सामाजिक भूमिका कोणती आहे हे तुम्हाला पक्कं माहिती असतं, मात्र चित्रपट करताना आपल्या भूमिकेला अनुरूप मांडणी करता येत नाही. तुमच्यासाठी त्या माणसांची गोष्ट सांगणं, त्या गोष्टीचे विविध भावनिक पैलू लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. ‘फौदा’ ही दोन देशांमधली कथा आहे, मात्र त्याचं भारतीय रुपांतरण करताना मी हिंदू विरुद्ध मुसलमान किंवा काश्मिरींविरुध्द भारतीय अशी बाजू घेतलेली नाही. तिथला जो तणाव आहे तो मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला आहे. इथे दहशतवाद्यांची आपली एक विचारसरणी आहे, तसंच आपल्या गुप्तचर विभागाची वा सैन्याची म्हणूनही एक भूमिका आहे, बाजू आहे. त्यातील मानवी संवेदनांवर भर देण्याचा मी प्रयत्न केला आहे, असं त्यांनी सांगितलं.

सध्या हिंदी चित्रपट चालत नाहीत, दाक्षिणात्य आणि प्रादेशिक चित्रपट चांगले चालतात, अशी चर्चा सुरू आहे.  दर १५ ते २० वर्षांनी कुठल्याही क्षेत्रात बदल घडतच असतात. नवीन पिढीला नव्या पद्धतीचे चित्रपट आवडतात. तंत्रज्ञान, अभिरुची याबाबतीत नवी पिढी कधीच पुढे गेली आहे, हिंदी चित्रपटसृष्टी मात्र अजून जुन्याच काळात अडकून पडली आहे. सध्या भव्य पौराणिक-ऐतिहासिकपटांचे, ठरावीक पद्धतीच्या दाक्षिणात्य चित्रपटांचे गारूड लोकांवर आहे. त्यांना फक्त त्यातली भव्यता दिसते, कथा कोणाकडेही नाही. अर्थात फार काळ हे टिकणार नाही. शेवटी प्रेक्षक आणि चित्रपटकर्मी दोघांनाही चांगल्या कथेवरच यावं लागणार आहे.

सुधीर मिश्रा

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:02 IST
Next Story
पालकांसाठी ‘बालभारती’ची उजळणी..