scorecardresearch

Premium

‘खडतर अनुभवांतून शहाणपण आलं’

हिंदी चित्रपटसृष्टीत भाईजान म्हणून ओळख असलेला अभिनेता सलमान खान सध्या ‘टायगर -३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Hindi Film Industry Tiger 3 movie Salman Khan
‘खडतर अनुभवांतून शहाणपण आलं’

हिंदी चित्रपटसृष्टीत भाईजान म्हणून ओळख असलेला अभिनेता सलमान खान सध्या ‘टायगर -३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २०१२ साली आलेल्या ‘एक था टायगर’ आणि २०१७ साली आलेल्या ‘टायगर जिंदा है’ नंतर ५ वर्षांनी या चित्रपट श्रृंखलेतील तिसरा भाग ‘टायगर – ३’ दिवाळीनिमित्ताने प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर चांगली कमाई केली. या चित्रपटात सलमान खानबरोबरच कतरिना कैफ, इम्रान हाश्मी आणि शाहरुख खानचेही विशेष कौतुक केले जाते आहे.  ‘टायगर ३’ला मिळालेल्या यशाच्या निमित्ताने बोलताना ही चित्रपट  श्रृंखला आपल्याला अधिक आवडते, त्यातही हा तिसरा चित्रपट इतर दोन भागांच्या तुलनेत आपल्याला अधिक आवडल्याचं सलमानने सांगितलं.

‘टायगर -३’ अधिक आवडण्यामागचं कारण स्पष्ट करताना त्याने सांगितलं, ‘हा चित्रपट सादरीकरण आणि कथालेखन दोन्ही स्तरावर अन्य दोन चित्रपटांच्या तुलनेत उत्तम आहे. त्याचं कारण म्हणजे या चित्रपटात झोया आणि टायगर दोघांनीही आपल्या देशासाठी भूतकाळात कशाप्रकारे काम केलं आहे हे दाखवण्यात आलं आहे. या दोघांचंही देशप्रेम खरंतर या चित्रपटाच्या तिन्ही भागांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे, पण काही लोकांच्या स्वार्थी आणि देशद्रोही कारवायांमुळे संपूर्ण देशच कसा वाईट ठरतो यावर या कथेत जोर देण्यात आला होता. मुळात एखाद्या देशाची नागरिकांकडून काय अपेक्षा असते? नागरिकांचं देशाप्रतिचं कर्तव्य, समर्पण या विविध मुद्दय़ांवर चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. त्याचबरोबर एकाच नात्यात बांधल्या गेलेल्या दोन भिन्न देशांच्या व्यक्तींचं आपल्या देशावर आणि एकमेकांवर असलेलं प्रेम आणि अत्यंत नाजूक परिस्थितीत असतानाही त्यांनी आपापल्या देशाचं रक्षण करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही हे खूप उत्तम प्रकारे या कथेत मांडण्यात आलं आहे. त्यामुळे इतर दोन चित्रपटांच्या तुलनेत मला हा तिसरा चित्रपट अधिक आवडतो’.

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
Shivrayancha Chhava Movie Review
Shivrayancha Chhava Movie Review : अतिरंजक शौर्यगाथा
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”
lal-salaam-trailer
Lal Salaam Trailer: धर्म, राजकारण व खेळाचं अनोखं मिश्रण असलेला रजनीकांत यांच्या बहुचर्चित ‘लाल सलाम’चा ट्रेलर प्रदर्शित

पटकथालेखन आणि दिग्दर्शन यांचा तगडा अनुभव असलेलं दिग्गज व्यक्तिमत्त्व सलमानच्या घरातच आहे. आणि त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन आजही आपण घेतो असं सलमान सांगतो. ‘माझे वडील सलीम खान नेहमी मला मार्गदर्शन करतात. माझ्या प्रत्येक चित्रपटाचं वाचन माझ्या वडिलांसमोर केलं जातं. मी आजही त्यांना माझ्या चित्रपटाबद्दल सगळी माहिती देतो. आणि आजही ते मला त्यांना त्या चित्रपटाबद्दल काय वाटतं हे मोकळेपणानं सांगतात’ असं तो म्हणला.  ‘टायगर’ चित्रपट श्रृंखलेतील प्रत्येक चित्रपटाचं दिग्दर्शन वेगवेगळय़ा दिग्दर्शकांनी केलं आहे. त्यांची प्रत्येकाची दिग्दर्शन शैलीही भिन्न आहे. त्यामुळे या तिघांबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता हेही सलमानने यावेळी सांगितलं. ‘टायगर’ चित्रपटाचे तिन्ही भाग साकारण्यासाठी कबीर खान, अली अब्बास जफर  आणि मनीष शर्मा या तिघांनीही दिग्दर्शक म्हणून खूप मेहनत घेतली आहे. एकापेक्षा एक सरस चित्रपट करण्याचा प्रयत्न या तिघांनीही केला. म्हणूनच या चित्रपटाचे तिन्ही भाग प्रेक्षकांना आवडले आहेत. मला स्वत:ला या तिघांबरोबरही काम करताना खूप मजा आली, असं त्याने सांगितलं. 

शाहरुख खानच्या ‘टायगर – ३’ मधील छोटेखानी भूमिकेबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला, ‘पठाण’मध्ये आम्हाला एकत्र पाहणाऱ्या प्रेक्षकांचा आनंद हा ‘करण-अर्जुन’ चित्रपटामुळे आहे. पडद्यावर आमची जोडी प्रेक्षकांना आवडते, कारण पडद्यामागे असलेली आमची मैत्रीही तेवढीच मजबूत आहे. जर तुमची तुमच्याबरोबर काम करणाऱ्या कलाकाराशी चांगली मैत्री नसेल तर त्याचा परिणाम अनेकदा पडद्यावरील तुमच्या अभिनयातही दिसतो, असं सांगत त्याने त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळण्याचं श्रेय त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मैत्रीला दिलं.

यशाचा गर्व नको, अपयशाने खचणं नको.. 

चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून अनेक चढउतार पाहिलेल्या सलमान खानला अपयशाची चव आजही चाखायला मिळते. ‘टायगर ३’च्या आधी प्रदर्शित झालेल्या ‘किसी का भाई किसी की जान’ या त्याच्या चित्रपटाला फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे ‘टायगर ३’ला यश मिळाले असले तरी या दोन्हीबाबतीत फार वाहवत जाऊ नये हेच अनुभवाने लक्षात आल्याचं तो म्हणतो. ‘यशाचा कधी गर्व करू नये आणि अपयशामुळे कधी खचून जाऊ नये. कारण यश हे कायम आपल्यासोबत राहत नाही. आज तुम्ही यशस्वी आहात. ठरावीक काळानंतर तुम्ही अपयशी ठरलात तर याचा तुम्हालाच सर्वात जास्त त्रास होणार आहे. त्या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही मनापासून आपलं काम करत राहिलं पाहिजे’ असं तो म्हणतो. ‘हे फक्त अभिनय क्षेत्रात नाही तर कोणत्याही क्षेत्रासाठी लागू होतं. चित्रपट उत्तम गाजला तरी आणि चित्रपट प्रेक्षकांना नाही आवडला तरी आपल्याला प्रत्येक येणाऱ्या चित्रपटासाठी मेहनत करावीच लागते, त्याला पर्याय नाही. चित्रपट गाजला तर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात आणि जर चित्रपट नाही आवडला तर आपला आवडता कलाकार पुढच्या चित्रपटात आणखी चांगलं काम करेल असा विश्वास त्यांचा मनात असतो. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातला हा विश्वास जपण्यासाठी जास्त मेहनत करण्यावरच जोर दिला पाहिजे, असं आपलं मत असल्याचं त्याने सांगितलं. अर्थात हे शहाणपण आपल्या आयुष्यातील आणि कारकीर्दीतील काही खडतर अनुभवानंतरच आलं आहे हेही तो कुठलीही भीड न ठेवता कबूल करतो. त्याच्या याच मनमोकळय़ा स्वभावामुळे तो अजूनही रसिकांच्या मनात ‘भाईजान’ म्हणून प्रेमाचं स्थान टिकवून आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hindi film industry tiger 3 movie salman khan amy

First published on: 03-12-2023 at 03:11 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×