|| गायत्री हसबनीस

समांतर धाटणीचे हिंदी चित्रपट करणारी अभिनेत्री शेफाली शहा इतर अभिनेत्रींपेक्षा काहीशी वेगळी आहे, अशी धारणा समीक्षकांसह इंडस्ट्रीत आहे. अनेक हिंदी मालिका, गुजराती नाटकं आणि चित्रपटांतून काम केल्यानंतर ‘दिल धडकने दो’ या चित्रपटातून नव्या लुकमध्ये ती प्रेक्षकांसमोर आली. ओटीटीवर तर ती सर्वात आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘अजीब दास्तान्स’, ‘दिल्ली क्राईम’ अशा वेबमालिकेतील आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकून घेणाऱ्या शेफाली शहाने ‘ह्यूमन’ या नव्या कोऱ्या वेबमालिकेतूनही आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. 

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

‘ह्यूमन’ या वेबमालिकेतून शेफालीने डॉक्टरची भूमिका साकारली आहे. एका वेगळ्या विषयातील गंभीर भूमिका असल्याने ती वेबच्या पडद्यावर निभावणं शेफालीकरताही नवं होतं, असं ती सांगते. औषधनिर्मितीत कसा अंधाधुंद कारभार चालतो. पैसा, राजकारण यांच्या दबावामुळे सामान्य गरीब माणूस आणि त्यांचे कुटुंबीय कशा प्रकारे भरडले जातात याचे थरारक वास्तववादी चित्रण यात मांडले गेले आहे. एक साधीसरळ, आपल्या कर्तव्याशी निष्ठता बाळगून असणारी डॉ. गौरी नाथ अशी तिची भूमिका असल्याचे शेफालीने स्पष्ट केले. त्यातही वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य सांभाळत आपल्या कामाला आणि कामावरील जबाबदारीला महत्त्व देत एक जीवनदूत म्हणून आपल्या पेशाचा आदर करणारी ही डॉ. गौरी नाथ आहे, असं ती सांगते. 

टाळेबंदीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र रुग्णांची कशी सेवा करत होते हे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे, पण स्वत: एका वेबमालिकेच्या माध्यमातून डॉक्टरांची भूमिका केल्यानंतर या सर्व आरोग्यदूतांबद्दल आपला आदर आणखीनच वाढला. प्रत्येक डॉक्टर व्यक्ती म्हणून दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो, परंतु माणूस म्हणून त्या सर्वांचा दर्जा खूप मोठा आहे. मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की, मी अशा एका कथेचा भाग आहे ज्यात सच्चेपणाचा आधार घेऊन आपल्या कोणालाच माहिती नसलेलं वास्तव मांडण्यात आलं आहे, असं ती सांगते. शेफालीचे पती विपुल शहा यांनी ही अभ्यासपूर्ण कथा लिहिली आहे. औषधांमध्ये भेसळ करून विषनिर्मिती करणाऱ्या वैद्यकीय समूहाने औषधांचे प्रयोग म्हणून ज्या प्रकारे सामान्य माणसांचे जीव घेतले त्यावर बेतलेली ही कथा आहे आणि एक डॉक्टर म्हणून माझी भूमिका येथे महत्त्वपूर्ण असल्याचे शेफालीने सांगितले. 

या मालिकेत आई, पत्नी आणि सून असे डॉक्टर गौरीचे अनेक कंगोरे आहेत, मात्र सर्वात आधी मी एक वैद्यक आहे आणि लोकांचे जीव वाचवणे हे माझे प्रथमकर्तव्य आहे असे मानणारी डॉक्टर गौरी वेगळी असल्याचे ती सांगतो. शेफालीच्या मते एक स्त्री म्हणून घरगुती जीवन आणि समस्यांसोबत लढणारी, नाती जपणारी डॉ. गौरी नाथ ही आपल्या कर्तव्यालाही तितकंच मोठं समजते. मुळात ही व्यक्तिरेखा साकारणंच खूप आव्हानात्मक आहे, कारण मी हे कबूल करते की, डॉ. गौरी नाथसारख्या व्यक्तिरेखेला मी कधीही प्रत्यक्ष भेटलेले नाही, ना अशा व्यक्तीबद्दल मी कधी ऐकले होते. कारण एकाच वेळी धैर्याने आपलं काम करणारी डॉक्टर अशी तिची ओळख असली तरी तिचाही एक भूतकाळ आहे, तिची बिघडलेली नाती आहेत आणि ज्या पद्धतीने ती आसपासच्या गोष्टींचा विचार करते, त्या जाणून घेते हे सगळंच मी आत्तापर्यंत साकारलेल्या स्त्री भूमिकांपेक्षा खूप वेगळे आहे, असे तिने सांगितले. 

खरं तर ओटीटी या माध्यमांवर येणाऱ्या नानाविध कथा आणि आशयांची निर्मिती पाहून खूप आनंद होत असल्याचेही शेफालीने सांगितले. त्यातून अशा कथांचा आपण भाग आहोत याचाही खूप अभिमान आणि गर्व वाटतो. मला खरंच खूप आनंद होतो या गोष्टीचा की, चांगल्यातील चांगल्या कथा हरहुन्नरी लेखक आणि दिग्दर्शकांकडून ओटीटीवर येत आहेत. मला ज्या प्रकारचे काम वास्तववादी आणि वेगळ्या धाटणीच्या आशयांतून करायचे होते ते आत्ता या काळात मला करायला मिळते आहे, तशी संधी मिळते आहे आणि यापुढेही मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच या कामाबद्दल आपण आनंदी असल्याचेही तिने सांगितले.

ओटीटीवर झळकणारे नावाजलेले चेहरे सध्या एकाच चित्रपटातून किंवा मालिकेतून एकत्र काम करताना दिसतात. ‘दिल्ली क्राईम’मध्ये रसिका दुगल, राजेश तेलंगसोबत शेफालीने काम केले होते आणि आता ‘ह्यूमन’मध्ये कीर्ती कुल्हारीसोबत काम केले आहे. यामुळे लोकप्रिय तसेच चांगल्या भुमिकेतून नावारूपाला आलेल्या कलाकारांना एकत्र आणण्याचा नवीन प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला आहे. कलाकार म्हणून अशा कसलेल्या कलाकारांबरोबर काम करण्यातील मजा वेगळी असते, असं शेफाली सांगते. प्रेक्षकांना अशा लोकप्रिय कलाकारांना पडद्यावर एकत्र अनुभवण्याचा आनंद मिळतो परंतु आम्हा कलाकारांसाठी एकमेकांसोबत काम करणे हे आम्ही सतत पडद्यावर करत असलेल्या प्रयोगाचाच एक भाग आहे. आम्ही सगळे काम करतानाही असाच विचार नेहमी करतो की, आम्ही रोज नवीन काय करू शकतो. एकाच धाटणीचे काम शक्यतो अशा व्यासपीठावरून कोणी करू नये, नाही तर अभिनयातील प्रयोगशीलता कमी होत जाईल, अशी भूमिकाही शेफालीने मांडली. प्रत्येक भूमिकेतून वेगळी व्यक्तिरेखा साकारणारी शेफाली आपल्या पात्राची निवड कशी करते याबद्दल सांगताना म्हणते, ‘‘मी भूमिका निवडताना पात्र, संहिता आणि दिग्दर्शक या तीन गोष्टी आवर्जून पाहते’’.

नवं काही

ह्युमन

‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर भारतात घडणाऱ्या मानवी औषधांच्या चाचणीवर आधारित ‘ह्युमन’ ही वेबमालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ‘ह्युमन’मधून वैद्यकीय जगातील रहस्ये, अनपेक्षित वळणे, खून, गूढता, वासना आणि हेराफेरी यांची चित्तथरारक कथा रंगवण्यात आली असून त्याचे मानवी आयुष्यावर होणारे परिणामही मालिकेत दाखवण्यात आले आहेत. आर्थिक फायद्यासाठी औषधांच्या चाचण्यांमध्ये केलेले घोटाळे या काल्पनिक कथानकातून मांडण्यात आले आहे. वैद्यक क्षेत्रात कशा पद्धतीने माणसांवर विषारी औषधांच्या चाचण्या केल्या जातात आणि कसे त्यातून राजकारण रंगत जाते त्यावर आधारित ही मालिका आहे. त्याचबरोबर पीडितांची कशाप्रकारे दिशाभूल केली जाते आणि मृत्यूच्या दारात सोडले जाते याचे वास्तव चित्रणही यातून पाहायला मिळणार आहे. मानवी जीवनाचे मूल्य, वैद्यकीय गैरव्यवहार, वर्गविभाजन आणि वेगवान वैद्यकीय शास्त्राचे परिणाम यांसारख्या विषयांना स्पर्श करून सत्ता संघर्ष, गुप्त भूतकाळ, आघात आणि खून इत्यादींचा थरार या वेबमालिकेतून पाहायला मिळणार आहे. विपुल अमृतलाल शाह आणि मोझेझ सिंग दिग्दर्शित या वेबमालिकेचे लेखन मोजेझ सिंग आणि इशानी बॅनर्जी यांचे आहे.  

कलाकार – शेफाली शाह, कीर्ती कुल्हारी, विशाल जेठवा, राम कपूर, सीमा बिस्वास, संदीप कुलकर्णी, आदित्य श्रीवास्तव आणि मोहन आगाशे   कधी – १४ जानेवारीला प्रदर्शित  कुठे- डिस्ने प्लस हॉटस्टार, हुलू 

 ये काली काली आँखे….

एक सामान्य घरातील मुलगा आणि त्याच्या प्रेमविश्वातील गुन्हेगारीकडे झुकणारी रहस्यमय कथा ‘ये काली काली आँखे्’ नेटफिक्ल्सवर प्रदर्शित झालीआहे.  प्रेयसीसोबत नव्याने आयुष्य जगणारा विक्रांत हा कशा प्रकारे राजकारण्याच्या मुलीच्या जाळ्यात अडकतो आणि त्यातून त्याची होणारी घुसमट व संघर्ष या वेबमालिकेतून पाहायला मिळेल. राजकारणात मुरलेल्या घरातून आलेली पूर्वा  विक्रांतच्या प्रेमात पडली आहे. त्यातून त्याला मिळवण्यासाठी ती वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यामुळे विक्रांत तिच्या जाळ्यात अडकणार का? तो आपल्या वैयक्तिक आयुष्याचे काय करून घेईल आणि शिखा या पात्रासोबत असणारे त्याचे प्रेमाचे नाते… अशा नाना प्रश्नांनी ही मालिका पुढे जाणार आहे. या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन सिद्धार्थ सेनगुप्ता यांचे आहे.

कलाकार – ताहिर राज भसिन, श्वेता त्रिपाठी, आंचल सिंग, बिजेद्रा काला, अनंत जोशी, सुनिता राजवार, अरुनोदय सिंग, अंजुमन सक्सेना आणि सौरभ शुक्ला   कधी – १४ जानेवारी प्रदर्शित  कुठे – नेटफिल्क्स

 ‘कौन बनेगी शिखरवती’

 मृत्युंजय नावाचा राजा आपल्या चार राजकन्यांना एकत्र बोलवतो. ‘शिखरवती’ हा किताब देण्यासाठी. शिखरवती परिवारातील या राजकन्या त्याही वेगवेगळ्या स्वभावाच्या शिखरवती बनतील की नाही यासाठी राजा परीक्षा घेणार आहे. पण हे शिखरवती प्रकरण नेमकं आहे काय आणि राजाला एकदम राजकन्यांमध्ये स्पर्धा का भरवायची आहे याची गंमतजंमत या मालिकेतून उलगडणार आहे. या राजघराण्यामध्ये शिखरवतीचा शोध सुरू आहे, कारण तिला राजाला वाचवायचे आहे. राजावर कराचा बोजा आलाय म्हणून की इतर काही कारणांमुळे हे मात्र मालिकेतूनच पाहायला मिळेल. घरात भिंतीवर फ्रेम केलेले चित्र आहे ज्यात अभिनेता नसीरुद्दीन शाह यांची ओळख राजा मृत्युंजय काहीसा खुळसट राजा म्हणून होते. पुढे रघुबीर यादव यांची ओळख शिखरवतीचा बिरबल म्हणून केली जाते. लारा दत्ता शिस्तप्रिय राजकुमारी देवयानी, सोहा अली खानला संस्कारी राजकुमारी गायत्री, कृतिका ट्र्रेंडग राजकुमारी कामिनी आणि अन्या सिंग नाजूक राजकुमारी उमा म्हणून ओळखली जाते. या चौघी एकत्र आल्यावर स्पर्धा कशी रंगणार आणि कोण शिखरवती होणार? याचा खुलासा ‘कौन बनेगी शिखरवती’ या वेबमालिकेतून होणार आहे.

कलाकार –  नसिरुद्दीन शहा, लारा दत्ता, सोहा अली खान, कृतिका कामरा, अन्या सिंग, रघुबीर यादव  कधी – ७ जानेवारीला प्रदर्शित  कुठे –  झी ५

रहस्यमय कथांच्या पठडीतील वेगळा प्रयोग म्हणजे ‘ह्यूमन’ ही वेबमालिका आहे. आपल्याला जे माहिती नाही त्यावर भाष्य करणारी, बोलणारी ही मालिका आहे. मी रंगवत असलेले पात्र अत्यंत गुंतागुंतीचं, सहज कोणालाही लक्षात येणार नाही अशा पद्धतीचं आहे. ही मालिका रहस्यमय असली तरी ती प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि हेच तिचे वेगळेपण आहे.

  • शेफाली शहा, अभिनेत्री