या आठवड्याच्या सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय सेतूपती यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. बंगळूरु विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता विजय सेतूपती यांच्यावर हल्ला केला होता. यामुळे काही काळ विमानतळावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेत विजय सेतूपती यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. घटनेला किरकोळ म्हणत विजय सेतूपतीने हा विषय संपवला होता. मात्र, हिंदू मक्कल काची नावाच्या एका गटाने विजय सेतुपतीला लाथ मारणाऱ्यास १००१ रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

हिंदू मक्कल काचीच्या अधिकृत ट्विटर हँडलने व्हिडीओचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विजय सेतुपती यांनी स्वातंत्र्य सेनानी देवीथिरु पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर अय्या आणि देशाचा अपमान केल्याचं म्हटलंय. “अर्जुन संपतने तेवर अय्याचा अपमान केल्याबद्दल अभिनेते विजय सेतुपतीला लाथ मारणाऱ्याला रोख रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली आहे. जो पर्यंत विजय सेतुपती माफी मागत नाही, तोपर्यंत त्याला जे कुणी लाथ मारतील त्याला बक्षीस देण्यात येईल. १ लाथ = रु. १००१/- दिले जातील,” असे ट्विट हिंदू मक्कल काचीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अर्जुन संपत यांनी पोस्ट केले आहे.

इंडिया टुडेशी बोलताना अर्जुन संपत यांनी आपण हे वक्तव्य केले असून व्हायरल व्हिडीओशी संबंधित असल्याचे मान्य केले. अर्जुन संपत म्हणाले, “विजय सेतुपतीला लाथ मारण्याचा प्रयत्न करणार्‍या महा गांधी यांच्याशी मी बोललो. विजय सेतुपतीने व्यंग्य केल्यामुळे हा वाद झाल्याचे महा गांधीने सांगितले.”