Hiraan Chatterjee Second Marriage Controversy : बंगाली अभिनेता आणि राजकारणी हिरन चॅटर्जीने मॉडेल रितिका गिरीशी दुसरं लग्न केलं आहे. पण या लग्नानंतर त्याची पहिली पत्नी अनिंदिताने आपला घटस्फोट झाला नसल्याचा दावा केला आहे. कायदेशीररित्या वेगळे न झाल्याने हिरनचं दुसरं लग्न अवैध असल्याचा आरोप अनिंदिताने केला आहे.
४८ वर्षीय हिरनने रितिकासोबतचे लग्नाचे फोटो फेसबूक अकाउंटवर शेअर केले आणि नंतर डिलीट केले. हिरन व रितिकाने बनारसमध्ये लग्न केलं. यानंतर अनिंदिताने रितिका व हिरनविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. तर अनिंदिताला घटस्फोटाची नोटिस पाठवण्यात आली आहे, असा दावा रितिकाने केला. पण अनिंदिताने तो फेटाळून लावला. रितिका व हिरन यांच्या वयात जवळपास २८ वर्षांचं अंतर असल्याचं म्हटलं जातंय.
मला माझ्या मुलीसमोर सांगायला लाज वाटते की…
द इंडियन एक्सप्रेस बांगलाशी बोलताना अनिंदिता म्हणाली, “मला माझ्या मुलीसमोर ही गोष्ट सांगायला लाज वाटते की तो आमच्याबरोबर या घरात राहत असताना त्याचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध होते. आमच्या फ्लॅटमधील सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे. त्यामुळे तो आमच्यासोबत किती दिवस किंवा किती काळ राहिला, हे मी सहजपणे सिद्ध करू शकते.” तसेच रितिका सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही तिने केला.
मुलीला सोशल मीडियावरून वडिलांच्या लग्नाबद्दल समजलं
हिरन व अनिंदिता यांना नायसा नावाची १९ वर्षांची मुलगी आहे. नायसाने तिच्या आईला पाठिंबा देणारा व्हिडीओ शेअर केला. “आपण सुरुवातीपासूनच एकमेकींना विश्वासाने सगळं सांगत आलोय. तू आयुष्यातील प्रत्येक भूमिका हिंमत, प्रेम आणि प्रतिष्ठेने बजावली आहेस. तू माझी आई, माझे वडील, माझी मार्गदर्शक आणि माझा सर्वात मोठा आधार आहेस आई…,” असं नायसा म्हणाली. वडिलांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावरून समजलं, असंही नायसाने नमूद केलं.
हिरन चॅटर्जीने अनिंदिताच्या आरोपांवर अद्याप उत्तर दिलेलं नाही. पण रितिकाने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. शस्त्रक्रिया झाल्याने मी मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने माध्यमांशी बोलण्याच्या स्थितीत नाही, असं रितिकाने म्हटलंय. तसेच तिचं व हिरनचं लग्न ५ वर्षांपूर्वीच झालंय आणि आता केलेला हा सोहळा फक्त मानसिक समाधानासाठी आयोजित करण्यात आला होता, असा दावा तिने केला. अनिंदिताला घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. हिरेन व तिचं लग्न वाराणसीमध्ये कोणत्याही दिखाव्याशिवाय अग्नीला साक्षी ठेवून पवित्रपणे पार पडले. जर कोणी या लग्नाला बेकायदेशीर मानत असेल, तर त्यांनी कायदेशीर पावले उचलावीत. आपल्याला या विषयावर आणखी काही बोलायचं नाही, असं रितिका गिरीने म्हटलंय.
हिरेन चॅटर्जीने अद्याप या प्रकरणावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याचं दुसरं लग्न चांगलंच वादात अडकलं आहे.
