कलाकारांचं खासगी आयुष्य कधीच कोणापासून लपून राहिलेलं नाही. खासकरून हॉलीवूड स्टार्सची लग्नं, रिलेशनशिप याबाबत प्रचंड चर्चा होताना आपल्याला दिसते. आताही असाच एक कलाकार त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आला आहे. हॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अल पचिनो वयाच्या ८३व्या वर्षी चौथ्यांदा वडील होणार आहेत. अल पचिनो यांच्या गर्लफ्रेण्डचीही आता बरीच चर्चा रंगत आहे. नूर अल्फल्लाह ही पचिनो यांची गर्लफ्रेण्ड आहे. ती अल पचिनो यांच्यापेक्षा ५२ वर्षांनी लहान आहे. नूर आठ महिन्यांची गरोदर आहे. लवकरच ती आनंदाची बातमी देणार आहे. आता याबद्दल सगळीकडे चर्चा होत असताना मात्र अल पचिनो यांचं एक वेगळंच वक्तव्य समोर आलं आहे. नूर ही आपल्यामुळे गरोदर राहिली असल्याबद्दल खुद्द अल पचिनो यांनीच शंका व्यक्त केली आहे. आणखी वाचा : भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर टिकली; AI ची कमाल अन् हॉलिवूड अभिनेत्रींचा अनोखा अंदाज मीडिया रिपोर्टनुसार अल पचिनो यांनी गर्लफ्रेण्ड नूरची पितृत्व चाचणी (Paternity Test) करण्याची मागणी केली आहे. नूर ही खरोखर आपल्यामुळेच गरोदर राहण्याबद्दल अल पचिनो यांनी शंका उपस्थित केली आहे. आता आपलं वय झालं असल्याने ही गोष्ट शक्य नसल्याचं गॉडफादर फेम अभिनेत्याचं म्हणणं आहे. तर नूरच्या सगळ्या चाचण्या झाल्या असून अल पचिनो हेच त्या मुलाचे वडील असल्याचा अहवाल aceshowbiz.com या वेबसाइटतर्फे प्रसिद्ध करण्यात आला होता. अल पचिनो आणि गर्लफ्रेण्ड नूर यांच्या नवीन बाळाबद्दल माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. यामुळे अल पचिनो यांची मुलंदेखील प्रचंड नाराज असल्याचं स्पष्ट झालं आहे. अल पचिनो आणि नूर हे दोघं एकेमकांना डेट करत असल्याच्या अफवा एप्रिल २०२२ पासून समोर आल्या. आता ८३ व्या वर्षी बाप बनणाऱ्या अल पचिनो यांनी पितृत्व चाचणी (Paternity Test)ची मागणी केल्याने याबद्दल आणखी चर्चा होताना दिसत आहे.