९८ व्या ऑस्करचे नॉमिनेशन २२ जानेवारी रोजी जाहीर झाले आहे. या नॉमिनेशनमध्ये अनेक हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना स्थान मिळालं आहे. भारतातून आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म कॅटगरीतून ‘होमबाऊंड’ हा चित्रपट शॉर्ट लिस्ट झाला होता. या चित्रपटाला नामांकन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट वर्गवारीत नामांकन मिळालं नाही.
करण जोहरने काय म्हटलंय?
ही बातमी समोर आल्यानंतर निर्माता करण जोहरने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. चित्रपटातले काही सीन असलेले प्रसंग त्याने पोस्ट केले आहेत. मला चित्रपट ऑस्करपर्यंत गेला याचा गर्व वाटतो आहे. नीरज तुला खूप सारं प्रेम. तुझ्या प्रकाशात आम्हाला चमकता आलं यासाठी धन्यवाद #होमबाउंड अशी पोस्ट करणने केली आहे.
होमबाऊंड हा एक संवेदनशील चित्रपट
होमबाउंड हा एक संवेदनशील आणि भावना प्रधान चित्रपट आहे. नीरज घेयवानने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याचा मसान हा चित्रपटही अशाच वेगळ्या धाटणीचा आणि तरल मानवी भावनांचं दर्शन घडवणारा होता. होमबाउंड मानवी नातेसंबंध, आठवणी, घराविषयीच्या भावना या सगळ्याबाबत भाष्य करतो. हा चित्रपट दोन मित्रांभोवती फिरतो. जे मित्र आपल्या आपल्या संघर्षांसह जगत आहेत, भूतकाळासह जगत आहेत. गावातल्या आठवणी, मग शहरात येणं लहानपणीचा काळ आणि वर्तमानातलं वास्तव या सगळ्या गोष्टी या चित्रपटात तरलपणे मांडल्या गेल्या आहेत. चित्रपटात लक्षात राहतील असे संवाद नाहीत, पण मौन साधत फक्त नजरेतून जो अभिनय केला आहे त्याला तोड नाही. चित्रपटात इशान खट्टर आहे तसंच जान्हवी कपूरचीही भूमिका आहे.
विविध फेस्टिव्हल्समध्ये होमबाउंडचं कौतुक झालं
होमबाउंड चित्रपट फिल्म फेस्टिव्हल्समध्ये कौतुकास पात्र ठरला होता. चित्रपटाची गोष्ट, मानवी संवेदना, सिनेमॅटोग्राफी या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे ऑस्करच्या स्पर्धेत हा चित्रपट निवडला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तिथे असलेल्या स्पर्धेमध्ये हा चित्रपट निवडला गेला नाही. होमबाउंड चित्रपट देशात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित केला गेला नाही. निवडक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि फेस्टिव्हल्समध्ये दाखवण्यात आला. पण चांगला चित्रपट पाहण्यासाठी लोक सिनेमागृहांमध्ये पोहचले होते. लोकांना हा चित्रपट भावला आणि त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाईही केली. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळेल अशी अपेक्षा होती पण तसं घडलं नाही.
