scorecardresearch

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच हनी सिंगने दिली टीनाबरोबरच्या नात्याची कबुली, म्हणाला “माझी गर्लफ्रेंड…”

पहिली पत्नी शालिनी तलवारपासून वेगळं झाल्यानंतर हनी सिंगने टीनाला डेट करायला सुरुवात केल्याच्या चर्चा होत्या

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच हनी सिंगने दिली टीनाबरोबरच्या नात्याची कबुली, म्हणाला “माझी गर्लफ्रेंड…”

प्रसिद्ध रॅपर हनी सिंग सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. घटस्फोटानंतर हनी सिंग मॉडेल टीना थडानीला डेट करत असल्याच्या चर्चा होताना दिसत होत्या. पण आता हनी सिंगने पहिल्यांदाच या चर्चांवर मौन सोडत आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिली आहे. पहिली पत्नी शालिनी तलवारपासून वेगळं झाल्यानंतर हनी सिंगने टीनाला डेट करायला सुरुवात केली होती पण दिल्लीतील एका कार्यक्रमात त्याने पहिल्यांदाच तिची ओळख गर्लफ्रेंड अशी करून दिली.

हनी सिंगने ६ डिसेंबर २०२२ ला दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी तो टीना थडानीचा हात पकडून या कार्यक्रमात आला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. यावेळी हनी सिंग ब्लॅक टक्सिडो आणि व्हाइट शर्टमध्ये खूपच हॅन्डसम दिसत होता. विशेष म्हणजे त्याचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेचा विषय ठरलं. तर टीना थाय-हाय स्लिट ड्रेस कमालीची सुंदर दिसत होती. दोघंही एकमेकांच्या हातात हात घालून जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

आणखी वाचा-Vidoe: घटस्फोटानंतर हनी सिंग पुन्हा प्रेमात, गर्लफ्रेंडचा हात पकडून कार्यक्रमात आला अन्…

आता या कार्यक्रमातील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात हनी सिंग पहिल्यांदाच टीनाची ओळख आपली गर्लफ्रेंड अशी करून दिली आहे. एवढंच नाही तर टीनाने त्याला नवीन नाव दिल्याचंही त्याने या कार्यक्रमात सांगितलं. टीनाकडे पाहून बोलताना हनी सिंग म्हणाला, “ही माझी गर्लफ्रेंड आहे टीना, तिने मला नवीन नाव दिलं आहे. ती म्हणाली की मी ‘हनी ३.०’ आहे.” हनी सिंगचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

दरम्यान हनी सिंगचा घटस्फोट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सप्टेंबर २०२२ मध्ये शालिनी तलवार आणि हनी सिंग यांनी अखेर घटस्फोट घेतला. पोटगी म्हणून शालिनीने २० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र हनी सिंगने पत्नी शालिनीला १ कोटी रुपयेच दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हनी सिंगच्या या निर्णयाशी शालिनी सहमत होती. घटस्फोटाच्या अगोदर शालिनीने हनी सिंग आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. हनी सिंग आणि त्याच्या कुटुंबियांनी आपल्याला मारहाण केल्याचं, तसेच हनी सिंगचे इतर महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याचंही तिने म्हटलं होतं. मात्र हनी सिंगने स्वतःचा बचाव करताना शालिनीने केलेले सगळे आरोप चुकीचे असल्याचा दावा केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 10:11 IST

संबंधित बातम्या