दिवाळी प्रकाशाचा सण आहे की चीनमध्ये तयार झालेल्या फटाक्यांचा? असा सवाल लेखक, अभिनेते, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीत चिन्मय यांनी फटाक्यांसंदर्भात विचारणा केली आहे.

चिन्मय यांनी लिहिलं आहे की, ‘फटाक्यांचा शोध चीनी लोकांनी लावला. भारतात फटाके मुघलांनी लोकप्रिय केले. आता फटाके हा हिंदू संस्कृतीचा मापदंड झाला आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे की चीनमध्ये तयार झालेल्या विषारी फटाक्यांचा सण आहे?

गेले काही दिवस फटाके तसंच ध्वनी प्रदूषण रोखण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या एका व्हीडिओवरून वादाला तोंड फुटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर चिन्मय यांनी थेट नाव न घेता आपली भूमिका मांडली आहे.

पावसाळा संपताच मुंबईच्या वायु प्रदूषणात वाढ झाली आहे. दिवाळीत फटाक्यांचा धूर यामुळं हवेचा स्तर आणखी खालावू शकतो. यावर उपाययोजना म्हणून मुंबई महानगरपालिकेने दिवाळी सेलिब्रिटी कॅम्पेन सुरू केले होते. उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की शहरातलं प्रदूषण वाढत आहे. सेलिब्रेटींचे व्हीडिओ पोस्ट करा आणि जनजागृती करा. त्यानंतर माधुरी दीक्षित, दिया मिर्झा यांचे व्हीडिओ पोस्ट करण्यात आले.

मुंबई महापालिकेने एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा मुंबईकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत आवाहन करत आहे. दिवाळीत फटाके फोडून ध्वनीप्रदूषण टाळा, असं दिया मिर्झा यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. मात्र महापालिकेने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर अमित साटम यांनी आक्षेप घेतला.

‘नमस्कार, दिवाळी उत्सव जवळ आला आहे. उत्सव साजरा करत असताना आपल्याला पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हीची काळजी घ्यायची आहे. फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण हे आपल्या सगळ्यांसाठी हानीकारक आहे. माझं तुम्हाला आवाहन आहे की दिवाळी आवाजांनी नाही तर आनंदांनी साजरी करा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा’! हा व्हिडीओ महापालिकेने डिलिट केला असला तरीही एक्स पेजवर तो आहे. अनेकांनी हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.

‘दिवाळीबाबत दिया मिर्झाने आम्हाला शिकवू नये’, असं म्हणत भाजपाचे नेते आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी संताप व्यक्त केला. ‘दिवाळी कशी साजरी करायची याचे धडे आम्हाला दिया मिर्झाने शिकवू नयेत. दिवाळी आणि आमची परंपरा ही आमच्या संस्कृतीत मुळापर्यंत आहे. आम्हाला कुणीही हे शिकवायला जाऊ नये’, असं साटम म्हणाले. अमित साटम यांनी १ नोव्हेंबरला रात्री १० च्या नंतर ही पोस्ट केली. ज्यानंतर मुंबई महापालिकेने दिया मिर्झाचा व्हिडीओ डिलिट केला.

महापालिकेने व्हिडीओ डिलिट केल्यानंतर दिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणतेही पैसे या मोहिमेसाठी घेतलेले नाहीत, भलाईचा जमानाच राहिला नाही’, असं म्हणत दियाने संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही दिया यांच्यावर टीका केली होती. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणाला खोडण्याचं कामही त्यांनी केलं आहे. अराजक पसरवण्याचं काम करणाऱ्या शक्तींशी हातमिळवणी करण्याचं काम दिया मिर्झा यांनी केलं आहे. त्यामुळे दिया मिर्झा यांनी हिंदू सणांच्या बाबतीत आम्हाला शिकवू नये’, असं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे.

‘दिवाळी कशी साजरी करायची हे दिया मिर्झांनी शिकवू नये. प्रत्येक हिंदू आज यामुळे नाराजच असणार, त्यामुळे दिया मिर्झाला घेऊन जो व्हिडीओ तयार करण्यात आला. ज्या कायम हिंदुत्व आणि भाजपाच्या विचारांच्या विरोधात असतात त्यांचा आम्ही विरोध दर्शवला आहे’, असं तावडे म्हणाल्या होत्या.

‘पर्यावरणाचा विषय आहे त्यासाठी कलाकारांची गरज आपल्याला आहे. मात्र ती यादी आहे ती आम्हाला दाखवली असती तर त्यातलं दिया मिर्झाचं नाव आम्ही हटवलं असतं. प्रशासनाने जर हा विषय घेतला आहे तर तेच आता या प्रकरणी उत्तर देऊ शकतात. १०० टक्के आम्ही दिया मिर्झाला ब्लॅक लिस्ट केलं आहे. जनजागृतीला आमचा विरोध नाही त्यामुळे आम्ही जी यादी नक्की झाली ती महापौर माझ्या टेबलवर यायला हवी होती. त्यामुळे मी या प्रकरणी प्रशासनाला जाब विचारणार आहे’, असंही रितू तावडे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांनी मात्र या प्रकरणावरून भाजपावर टीका केली आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या प्रदूषणमुक्त दिवाळीच्या आवाहनावरून सुरू झालेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेला मिर्झा यांची हटवलेली चित्रफीत पुन्हा प्रसारित करण्याचे आदेश दिले. मात्र, न्यायालयाने स्पष्ट सुनावल्यानंतरही भाजप नेत्यांकडून मिर्झा यांच्यावर टीका करणे सुरूच आहे.