रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश प्रमुख भूमिकेत असणाऱ्या रामायण चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. काही हजार कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विदेशात या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. भारतात या चित्रपटाला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
रामायण म्हटलं की सगळ्यांना रामानंद सागर दिग्दर्शित १९८७ मध्ये प्रदर्शित मालिकेची आठवण होते. काही तासांनी प्रदर्शित होणाऱ्या रामायण चित्रपटातील व्हीएफएक्सबद्दल चर्चा सुरू आहे. ४० वर्षांपूर्वी रामानंद यांनी CGI आणि VFX विना मालिकेची निर्मिती कशी केली?
कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान हाताशी नसतानाही रामानंद सागर यांनी मालिकेत पुष्पक विमान उडताना दाखवलं होतं. हनुमान डोंगर उचलून संजीवनी आणतो हे दाखवलं होतं. युद्धही दाखवलं होतं. या सगळ्यासाठी आता VFX वापरले जातात. VFX नसताना रामानंद सागर यांनी पुष्पक विमान उडताना कसं दाखवलं होतं हे समजून घेणं रंजक आहे.
रामायण मालिकेचं चित्रीकरण कसं झालं होतं?
काही रिपोर्ट्सच्या आधारे रामायण मालिकेचं बजेट ७ कोटी रुपये एवढं होतं. ७८ भागांची मालिका होती. प्रत्येक एपिसोडसाठी ९ लाखांचा खर्च करण्यात आला होता. गुजरात राज्यातल्या उमरगाव इथे मालिकेचा सेट उभारण्यात आला होता. समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेलं उमरगाव शहरात समुद्र, डोंगर, निसर्ग हे सगळं होतं. अयोध्या, किष्किंधा, जंगल या सगळ्या गोष्टींची गरज हे गावच करत पूर्ण करत असे.
रामायण मालिकेत रामाच्या भावाच्या लक्ष्मणाची भूमिका सुनील लहरी यांनी केली होती. लक्ष्मणाचं पात्र साकारल्यानंतर सुनील यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. एका मुलाखतीदरम्यान मालिकेचं शूटिंग कसं होतं याबाबत त्यांनी सांगितलं होतं. ‘पुष्पक विमान काल्पनिक होतं. कोणालाही काहीही माहिती नव्हतं. विमान कसं असणार, ते कसं उडणार वगैरे काहीच कल्पना नव्हती. आर्ट डिपार्टमेंटने तीन चार स्केचेस तयार केली. रामानंद सागर यांनी ही स्केचेस दाखवण्यात आली. त्यांना असं विमान हवं होतं जे खरंखुरं वाटेल’, असं त्यांनी सांगितलं.
असं उडालं पुष्पक विमान
सुनील यांनी सांगितलं की, ‘या स्केचेसपैकी एक मॉडल निवडण्यात आलं. त्या मॉडेलसंदर्भात चार ते पाच लोकांचं मत विचारात घेण्यात आलं. त्या स्केचमध्ये दाखवलंय तसं पुष्पक विमान तयार करण्यात आलं. क्रोमा म्हणजे हिरव्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर या विमानाचं चित्रीकरण करण्यात आलं. ब्ल्यू स्क्रीनवर चार फूट उंचीवर विमान ठेऊन चित्रीकरण करण्यात आलं. हे प्रसंग आऊटडोअर चित्रीकरणाच्या प्रसंगाबरोबर एकत्र करण्यात आले. आऊटडोअर सिक्वेन्स स्वतंत्र चित्रित करण्यात आले होते. ते एकमेकात मर्ज करून पुष्पक विमान उडतं असं दाखवण्यात आलं’.
रामानंद सागर यांचे चिरंजीव प्रेम सागर यांनीही एका मुलाखतीत रामायणचं शूटिंग कसं झालं याबाबत माहिती दिली होती. ‘त्या चित्रीकरणात तांत्रिक गोष्टी कमी आणि जुगाडाचा वापर जास्त होता. सकाळच्या वेळी शूटिंग असेल तर उदबत्यांच्या धुराच्या माध्यमातून धुकं दाखवलं जात असे. शूटिंग रात्री असेल तर रुईपासून तयार केलेले ढग दाखवले जायचे. रामायणातल्या एका प्रसंगात शंकर हिमालयात नृत्य करतात असं दृश्य होतं. बॅकग्राऊंडला एक स्क्रीन वापरण्यात आली. प्रोजेक्टरच्या माध्यमातून छोट्या ग्रहांचे फोटो दाखवण्यात आले होते’, असं ते म्हणाले.
पालक मॅश करून संजीवनी बूटी
रामायणातील युद्धाचे प्रसंग चित्रित करण्यासाठी SEG 2000 (स्पेशल इफेक्ट्स जनरेटर) यांचा वापर करण्यात आला होता. स्पेशल इफेक्ट्समुळे ग्लास मॅटिंगचा प्रयोग करण्यात आला. हनुमान आणि रावण यांच्यातल्या लढाईचं दृश्य प्रचंड पावसात चित्रित करण्यात आलं होतं अशी आठवण सुनील लहरी यांनी सांगितलं. हनुमानाची भूमिका करणारे अभिनेते दारा सिंह यांनी रावणाच्या रथाला गदा मारताच, रथ वाकडा झाला. दारा सिंह यांनी स्टुलावर उभं राहून रावणाबरोबर लढाईचं चित्रीकरण केलं होतं.
लढाईच्या दृश्यात रक्त दाखवण्यासाठी कापसावर स्प्रिट गम लावून दाखवलं जात असे. त्यावर खोटं रक्त लावण्यात येई. जेणेकरून जखमी माणसं आणि त्यांच्या जखमातून वाहणारं रक्त खरं वाटेल. संजीवनी बूटी तयार करण्याची प्रक्रिया गंमतीदार होती. पालकाची पेस्ट करून संजीवनी बूटी दाखवण्यात आली होती. लक्ष्मणाच्या शरीरावर ती लावण्यात आली होती.
मालिकेत रामाची भूमिका निभावणाऱ्या अरुण गोविल यांनीही चित्रीकरणादरम्यानचा किस्सा ऐकवला होता. राम शबरीचं बोरं खातात असा प्रसंग होता. या दृश्याचं चित्रीकरण झालं तेव्हा बोरांचा हंगाम नव्हता. त्यामुळे अरुण यांनी आंबट बोरं खावी लागली. आंबट बोरं खाऊन ती गोड असल्याचा अभिनय करावा लागला अशी गंमत अरुण यांनी सांगितली होती.
४० वर्षांपूर्वीच्या रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचं गारुड आजही आहे. अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी यांना अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली होती.
