Hridaynath Mangeshkar will build Hospital to Honor Sisters Asha Bhosle& Lata Mangeshkar : दिग्गज गायिका आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेते, फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी तसेच संगीत विश्वातील अनेक मान्यवर शिवाजी पार्कवर आले होते. आशा भोसलेंच्या बहीण उषा मंगेशकर देखील अंत्यसंस्काराला आल्या होत्या. पण आशा भोसलेंचे भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर मात्र बहिणीला अखेरचा निरोप देण्यासाठी येऊ शकले नाही. यामागचं कारण त्यांनी स्वतः सांगितलं. तसेच एक मोठी घोषणाही केली आहे.

आशा भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका भव्य रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी बहिणीच्या निधनानंतर ही घोषणा केली आहे. लता व आशा मंगेशकर यांच्या नावाने आशियातील सर्वात मोठे रुग्णालय बांधणार आहेत. हे रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी समर्पित असेल, इथे सामान्य लोकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.

हृदयनाथ मंगेशकर आशाताईंच्या अंत्यसंस्काराला का गेले नाही?

“माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मला मुंबईला अंत्यसंस्कारासाठी जाता आलं नाही, याचं दुःख आहे,” अशी माहिती हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१६ तारखेला उद्घाटनासाठी आशाताई येणार होत्या…

हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की लता मंगेशकर यांच्या इच्छेनुसार पुणे शहराच्या बाहेर नांदोशी गावात जमीन घेतली आहे. १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसचे मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. आशा भोसलेसुद्धा इथे उपस्थित राहणार होत्या पण, त्यांचे निधन झाल्याने १६ एप्रिलचा कार्यक्रम करायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे आम्ही आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

“माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी लता मंगेशकर यांनी त्यांच्या नावे पुण्यात एक मोठं रुग्णालय उभारायचं ठरवलं होतं. नंतर आम्ही मोठ्या मेहनतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बांधलं. आता आम्ही दीदीच्या नावे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. आशा ताईंनी ‘या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मी येईन’, असं म्हटलं होतं. पण, त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आता त्या आपल्यात नाहीत,” असं हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.

‘लता-आशा मंगेशकर रुग्णालय’ उभारण्यात येणार

“आधी आम्ही लता दीदींच्या नावे हॉस्पिटल बांधायचं ठरवलं होतं, पण आता आम्ही आशाताईंच्या नावानेही हॉस्पिटल बाधणार आहोत. या रुग्णालयाचं नाव ‘लता-आशा मंगेशकर रुग्णालय’ असे असेल. या माध्यमातून लतादीदी आणि आशाताई या दोघींना श्रद्धांजली वाहण्याचा आमचा प्रयत्न आहे. आशियातील हे सर्वात मोठे रुग्णालय असेल, असा आम्ही प्रयत्न करतोय. जागा खूप मोठी आहे. बघू आता देवाच्या कृपेनं होईल,” असं हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.

हृदयनाथ मंगेशकर एक संग्रहालय उभारण्याचा विचार करत आहेत. ज्यामध्ये मंगेशकर कुटुंबाचा समृद्ध संगीत वारसा सर्वांना पाहता येईल. या संग्रहालयात लोकांना केवळ माहितीच मिळणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरॅक्टिव्ह पद्धतीने संगीत शिकता देखील येईल, अशी माहिती हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली.