अपना सपना मनी मनी

‘मोहेंजोदारो’नंतर हृतिक ‘काबिल’ या चित्रपटात काम करतो आहे.

दोन बिग बजेट चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटल्यानंतर त्या हिरोची अवस्था काय होत असेल? याची कल्पना सध्या काही आघाडीच्या बॉलीवूड हिरोंकडे पाहून येते. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘बँग बँग’ आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदारो’ हे दोन्ही चित्रपट आपटल्याने आता ताकही फुंकून प्यायचे या वृत्तीने हृतिक चित्रपटांची निवड करतो आहे. अर्थात, या चित्रपटांच्या निवडीमागे पैसा हे मोठे कारण असल्याने हृतिकने निवडलेल्या चित्रपटांपेक्षा त्याने सोडलेल्या चित्रपटांची चर्चा जास्त आहे.

‘मोहेंजोदारो’नंतर हृतिक ‘काबिल’ या चित्रपटात काम करतो आहे. शाहरुख खानच्या ‘रईस’बरोबर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने तिकीटबारीवरची त्याची कमाई आधीच विभागली गेली आहे.  यशराज प्रॉडक्शनच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात हृतिक काम करणार होता. मात्र पैशावरून हृतिक आणि आदित्य चोप्रा यांच्यात वाद झाले आणि तो या चित्रपटातून बाहेर पडला. सिद्धार्थ आनंदनेही हृतिकला घेऊन ‘फायटर’ चित्रपटाची घोषणा केली होती. हृतिकला साजेशी अशी पटकथा, स्टंट्स असल्याने त्याच्याबरोबरच्या या चित्रपटासाठी सिद्धार्थ आनंदने संजय दत्तबरोबरचा ‘बदला’ हा आपला चित्रपट मागे ठेवला होता. मात्र सिद्धार्थचा हा चित्रपट निर्माता म्हणून साजिद नाडियादवालाने नाकारल्याने निर्मितीचा प्रश्न उभा राहिला.

 

प्रियांकाकडून बॉलीवूडपटांचीही निर्मिती?

हॉलीवूडमध्ये राहून, काम करून मायदेशी आपल्या प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मितीवरही लक्ष ठेवून असणारी प्रियांका चोप्रा आता बॉलीवूडपटांच्या निर्मितीविषयीही गंभीरपणे विचार करत आहे. प्रियांका चोप्राच्या ‘पर्पल पेबल्स’ प्रॉडक्शन कंपनीअंतर्गत भोजपुरी, मराठी आणि पंजाबी अशा तीन भाषांमधील चित्रपटांची निर्मिती होते आहे. प्रियांका स्वत: ‘क्वाँटिको’चे दुसरे पर्व आणि ‘बेवॉच’ या हॉलीवूडपटासाठी काम करत असल्याने तिचा चित्रपट निर्मितीचा कारभार तिची आई मधु चोप्रा सांभाळत आहेत. तिचा पहिला मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’विषयी सध्या खूप उत्सुकता आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. मात्र, तीन प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मितीचे गणित सांभाळताना बॉलीवूडपटाच्या निर्मितीचा विचार नाही म्हटले तरी धाडसी ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hrithik roshan