गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ‘काबिल’ आणि ‘रईस’ या दोन चित्रपटांविषयीच्या बऱ्याच चर्चा रंगत होत्या. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे चांगलीच टक्कर पाहायला मिळणार अशी अपेक्षा होती. हे चित्रपट प्रदर्शित झाले खरे. पण, दोन्ही चित्रपटांच्या कथानकामध्ये असणारे वेगळेपण, मुख्य भूमिकेत असणारे कलाकार आणि त्यांच्या भूमिका पाहता प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘काबिल’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या खात्यात १०.४३ कोटी रुपयांचा गल्ला जमला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विट केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच प्रेक्षकांमध्ये कथानकाबाबत कुतुहल होते. त्यामुळे ‘काबिल’च्या वाट्याला आलेले हे यश चित्रपटाच्या वेगळ्या कथानकामुळेही असू शकते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

हृतिकच्या ‘बॅंग बॅंग’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २७.५४ कोटींचा गल्ला जमविला होता. त्या तुलनेत ‘काबिल’ची सुरुवात काहीशी संथ झाली असली तरीही आठवड्याच्या मधल्याच वारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या या लॉन्ग विकेण्डदरम्यान प्रदर्शित होऊनही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे अशा चर्चा सध्या रंगत आहेत. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबिल’ हा चित्रपट हृतिक रोशच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा चित्रपट समजला जात आहे.

दरम्यान, शाहरुख खानची मुख्य भूमिका असणारा ‘रईस’ हा चित्रपट हृतिकच्या चित्रपटाला चांगलीच टक्कर देत आहे. सोशल मीडियावर काही ट्रेड अॅनालिस्टनी या चित्रपटांच्या कमाईचे आकडे पोस्ट केले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या ट्विटनुसार शाहरुखच्या शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी २१ कोटींचा गल्ला जमविला आहे. भारतासोबतच परदेशातही ‘रईस’ चांगली कमाई करत असल्याची माहितीसुद्धा सूत्रांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाने २. ७१ लाख तर न्युझीलंडमध्ये या चित्रपटाने १०.९३ लाख रुपयांची कमाई केली आहे.