पतीकडून धर्म परिवर्तनासाठी मारहाण करून जबरदस्ती केली जात असल्याचा धक्कादायक आरोप छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने केला आहे. प्रिती तलरेजा असं या अभिनेत्रीचं नाव असून, अभिजित पेटकर असं पतीचं नाव आहे. प्रितीने अभिजित पेटकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर तिने ट्विट केले आहेत. यात पतीकडून मारहाण होत असल्याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे.

प्रितीने कल्याण पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल गेली आहे. पती अभिजीत पेटकरने धर्मबदलला असला तरी नाव बदललेले नाही, असं तिने तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिजित हा कल्याणमध्ये जीम चालवतो. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्याने त्याने धर्म परिवर्तन केले नसल्याचे समोर आले आहे.

प्रितीने या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. ‘माझ्या पतीने मला प्रेमाच्या नावाखाली फसवले असून, माझा वापर केला आहे. त्याने माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला आहे,’ असं तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. इतकच नव्हे तर तिने हे ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील ते टॅग केले आहे. त्यानंतर प्रितीने आणखी एक ट्विट केले आहे.

अभिजित आणि प्रितीने तीन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. त्यांना दहा महिन्याची एक मुलगी देखील आहे. प्रितीने पोस्टमध्ये अभिजित एक मुस्लिम असून, त्यांने माझ्याशी निकाह केला होता. पण मुस्लिम कायद्याअंतर्गत त्यांना लग्नाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. आता अभिजित तिला धर्मपरिवर्तन करण्यासाठी मारहाण करत असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.