घरात समारंभ आहे पण ऑफिसमध्ये सुट्टी मिळत नाही… खूप दिवसांनी बाहेर जाण्याचा प्रोग्राम बनवला पण ऑफिसमधलं कामच संपत नाही, अशी अवस्था तर सगळ्यांचीच असते. पण काही ऑफिसमध्ये तर बाहुबली सिनेमा बघण्यासाठी सुट्टीचा खास फॉर्म तयार करण्यात आला आहे. त्यामुळे बाहुबलीच्या चाहत्यांना सिनेमा बघायला जाण्यासाठी आता दुसरी कोणती कारणं द्यायची गरज नाही.

बाहुबली लीव अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये फक्त तुम्हाला सुट्टी हवी आहे एवढंच लिहायचं नाही, तर ‘बाहुबली २’ तुम्हाला २८ तारखेलाच का बघायचाय याची कारणंही तुम्ही लिहू शकता. यासाठी काही पर्यायही या फॉर्ममध्ये दिले आहेत.

* मी बाहुबलीचा दुसरा भाग बघण्यासाठी ६५८ दिवसांची वाट पाहिली आणि आता मी अजून थांबू शकत नाही…
* मला राणी देवसेनेला पाहायचंय…
* कटप्पाने बाहुबलीला का मारंल याच उत्तर मला हवंय
* इतर लोक बाहुबली बघण्याचा आनंद घेत असताना मला त्यापासून वंचित राहायचं नाही
* भल्लालदेववर विजय संपादन करताना प्रभासला मला पाहायचं आहे.

हा फॉर्म संपताना वरिष्ठांसाठी एक विशेष टिपणीही त्यात लिहिण्यात आली आहे. ‘मला प्रामाणिकपणे वाटतं की तुम्हीही हा सिनेमा पाहावा, धन्यवाद.’

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली- द कनक्ल्युजन’ हा सिनेमा जगभरात सुमारे ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतातही अंदाजे ६५०० स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे तिकीट बारीवरचा गल्ला कमवण्यातही ‘बाहुबली २’ नंबर एक बनेल यात काही शंका नाही. बाहुबलीच्या संपूर्ण टीमने या सिनेमासाठी अफाट मेहनत घेतली होती. या मेहनतीचे चीज झाल्याचीच भावना सध्या सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते आहे. अभिनेता प्रभास, राणा डग्गुबती, सत्यराज, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा हा सिनेमा उद्यापासून (२८ एप्रिल) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.