हैदराबादमधील अतिशय लोकप्रिय रॅपर रुहान अरशदने इस्लाममुळे म्यूझिक इंडस्ट्री सोडली आहे. त्याचे ‘मियाँ भाई’ हे गाणे विशेष गाजले होते. पण आता इस्लामसाठी इंडस्ट्री सोडत असल्याचे त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.

रुहानने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘मी म्यूझिक इंडस्ट्री सोडत आहे. मी यापुढे म्यूझिक व्हिडीओ तयार करणार नाही. इंशाअल्लाह ते करण्यापासून मी स्वत:ला थांबवेन. ही गोष्ट आपल्याला करायची नाही असे स्वत:ला समजावेन. इस्लाममध्ये म्यूझिक हराम आहे’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीची भरघोस कमाई, पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची घोडदौड!

रुहान अरशद विषयी बोलायचे झाले तर त्याचे ‘मियाँ भाई’ हे गाणे यूट्यूबवर विशेष गाजले होते. हे गाणे जवळपास ५२ कोटी लोकांनी पाहिले होते. तसेच रुहानचे यूट्यूबवर २३ लाख सब्सक्रायबर्स आहेत. गुरुवारी त्याने यूट्यूबच्या माध्यमातून म्यूझिक इंडस्ट्रीला रामराम ठोकत असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत एक महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे म्हटले होते.

‘मला माहितीये इस्लाममध्ये संगीत हराम आहे. पण संगीतावरील प्रेम आणि पॅशनमुळे मला यश मिळाले. मी इथपर्यंत पोहोचलो. माझा अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या कुटुंबीयांना सर्व काही सांगितले आहे. अल्लाहने दिलेला हा एक संकेत असू शकतो. मला पाहून जे रॅपर बनले त्यांना एक विनंती आहे की तुम्ही देखील हे सर्व सोडून द्या. इस्लाममध्ये जे हराम आहे त्या गोष्टी लांब ठेवून मी तुमच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करेन’ असे व्हिडीओमध्ये रुहान पुढे म्हणाला आहे.