बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यातच आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, मात्र मी देशहितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रचार करणार आहे, असं कंगनाने शनिवारी मथुरेत म्हटलंय. मथुरेत श्रीकृष्ण जन्मस्थानाला भेट दिल्यानंतर कंगनाने पत्रकारांशी संवाद साधला.

२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाचा प्रचार करणार का, असे विचारले असता कंगना म्हणाली, “मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. जे देशहितासाठी काम करत आहेत, त्यांच्यासाठी मी प्रचार करेन.” दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लोकांना भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष जन्मस्थान पाहता यावे, यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा कंगनाने व्यक्त केली. भगवान कृष्णाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी एक ईदगाह आहे, असा दावाही यावेळी कंगनाने केला.

तिच्या विधानांमुळे लोकांच्या भावना दुखावल्याचा दावा करणाऱ्या घटनांवर कंगना म्हणाली, “जे प्रामाणिक, धाडसी आणि राष्ट्रवादी आहेत, तसेच जे देशाबद्दल बोलतात, त्यांना मी जे म्हणते ते बरोबर आहे हे समजेल.”

पंजाबमध्ये गाडीवर हल्ला झाल्याचा कंगनाचा आरोप..

दरम्यान, अभिनेत्री कंगना राणौतने शुक्रवारी पंजाबमधील किरतपूरमध्ये तिची कार शेतकऱ्यांनी घेरल्याचा आरोप केला होता. ही घटना चंदीगड-उना महामार्गावरील बुंगा साहिब, किरतपूर साहिब येथे घडली होती. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱ्यांनी तिच्या कारला कसे घेरले आणि तिच्यावर हल्ला केला, याबद्दल सांगितले होते.

“मी पंजाबमध्ये पाऊल ठेवताच जमावाने माझ्या कारवर हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत,” असे हा व्हिडिओ शेअर करत कंगना रणौतने म्हटले आहे. यानंतर, कंगनाने आणखी बरेच व्हिडिओ देखील शेअर केले आहेत ज्यात तिने बाहेरच्या स्थितीवरुन टीका केली होती.