नवाझमध्ये आपल्याला मांझी दिसल्याचे ‘मांझी’ चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये म्हटले. ‘मांझी’ चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असून, मांझीच्या मुख्य भुमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे.
नवाझला त्याच्या यशाबद्दल विचारले असता, माझ्या यशाचे श्रेय मी नशिबाला देत नाही, असे त्याने सांगितले. मी गेली १५ वर्षे चित्रपटक्षेत्रात मेहनत घेत असून, इथपर्यंत पोहचण्यासाठी मला अथक परीश्रम करावे लागले आहेत. यश प्राप्तीनंतरदेखील माझे पाय जमीनीवरच रहाणार असल्याचे तो म्हणाला.
‘मांझी’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे. बिहारमधील एका लहानश्या खेड्यात दशरथ मांझी हे आपल्या छोट्या कुटुंबासह रहात होते. त्यांच्या पत्नीला अपघात झाला असता तिला तातडीने शहरातील दवाखान्यात नेणे गरजेचे होते. दवाखान्याच्या वाटेवर असलेल्या डोंगरामुळे तिला वेळेवर दवाखान्यात नेता न आल्याने तिचे प्राण वाचू शकले नाही. या दुर्दैवी घटनेचा राग मनात ठेवून मांझी यांनी तब्बल २२ वर्षे कुदळ व फावड्याच्या सहाय्याने डोंगर पोखरून शहराकडे जाण्याची वाट तयार केली. याच घटनेवर हा चित्रपट आधारीत असून, ‘व्हायकॉम १८’ व ‘एनएफडीसी इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित करत आहेत. दमदार कथानक आणि नवाझचा अभिनय या जमेच्या बाजू असलेला हा चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.