२०२५ मध्ये जो कुंभमेळा झाला त्यात मोनालिसा नावाच्या एका मुलीचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. ही मुलगी रुद्राक्ष विकत होती. त्यानंतर तिला एक चित्रपट मिळाला तेव्हाही तिची चर्चा झाली होती. तिचं आकर्षक सौंदर्य आणि तिचे खास असे घारे डोळे यामुळे मोनालिसा भोसले हे नाव चर्चेत आलं होतं. आता पुन्हा एकदा तिची चर्चा होते आहे कारण तिने प्रियकर फरमान खानशी लग्न केलं आहे. तिच्या लग्नानंतर हा लव्ह जिहाद आहे अशा प्रतिक्रिया येत आहेत.ज्यावर मोनालिसा भोसले आणि फरमान खान यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि उत्तर दिलं आहे.

मोनालिसा भोसलेने काय म्हटलं आहे?

माझं जे लग्न झालं आहे ते हिंदू रिती रिवाजाने झालं आहे. माझा प्रियकर फरमान माझ्याशी लग्न करु इच्छित नव्हता. पण मीच त्याला सांगितलं की आपण लग्न करु. माझे आई वडील दुसऱ्या मुलाशी माझं लग्न लावून देणार होते. मला तो मुलगा पसंत पडला नाही. ज्या मुलाशी माझं लग्न लावून देणार होते तो माझ्या आत्याचा मुलगा होता. तो माझा भाऊ आहे, मी त्याच्याशी लग्न कसं करणार? माझे वडील आले आहेत. पण ते आमच्या लग्नाला आले नव्हते. त्यांना हे माहीत आहे की आम्ही लग्न केलं आहे. ते थोडे नाराज आहेत. मी हिंदू रिती रिवाजाने लग्न केलं आहे. माझं लग्न म्हणजे लव्ह जिहाद नाही. मी सगळ्या धर्मांना मानते. मी लग्न केलं आहे हा लव्ह जिहाद नाही असं मोनालिसा भोसलेने म्हटलं आहे. तसंच तिचा नवरा फरमाननेही महत्त्वाचं विधान केलं आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

मोनालिसाचा नवरा फरमान खान काय म्हणाला?

फरमान म्हणाला मोनालिसा आणि माझं लग्न झालं असलं तरीही ती हिंदूच आहे मी मुसलमान आहे. आम्ही दोघांनीही धर्म बदलून लग्न केलेलं नाही. कलाकार हा कलाकार असतो त्याला धर्म नसतो. मी एक अभिनेता म्हणून काम करतो. मल्याळम सिनेमात काम करतो, हिंदीत काही छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. मोनालिसाशी मी हिंदू रितीरिवाजाने लग्न केलं आहे. माझं आणि मोनालिसाचं प्रेम आहे त्यामुळे आम्ही लग्न केलं आहे. त्यासाठी धर्मांतर आवश्यक नाही. मी मूळचा उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातला आहे. मोनालिसा भोसले हे माझं नाव आहे. मी कायद्याने सज्ञान आहे. माझं आडनाव भोसले आहे. मोनालिसाचा जन्म २००८ चा आहे. मध्य प्रदेश सरकारचा जन्म दाखला आमच्याकडे आहे. मोनालिसा अल्पवयीन नाही तर १८ वर्षांची आहे असंही फरमान खानने सांगितलं.

सनोज मिश्रा म्हणाले होते मोनालिसा लव्ह जिहादला बळी पडली

मोनालिसाने काल (११ मार्च) रोजी केरळमध्ये तिच्या मुस्लीम प्रियकर फरमान खान याच्याशी लग्न केले. मोनालिसाने पोलिस संरक्षणात केरळमध्ये आधी सिव्हिल मॅरेज केले आणि त्यानंतर मंदिरातही विवाह केला असल्याचे सांगितले जात आहे. मोनालिसाच्या लग्नामुळे तिला इंडस्ट्रीत आणणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनाही मोठा धक्का बसला आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे, त्याचबरोबर त्यांनी मोनालिसावर काही गंभीर आरोपही केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, मोनालिसा ही ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरली आहे. मात्र मोनालिसाने नवऱ्यासह पत्रकार परिषद घेत मी लग्न केलं आहे लव्ह जिहाद नाही असं म्हणत या टीकेला उत्तर दिलं आहे.