Radhika Apte Statement : अभिनेत्री राधिका आपटे तिच्या उत्कृष्ट अभिनया आणि धाडसी भूमिकांसाठी ओळखली जाते. राधिका प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असली, तरी तिने काही मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी भाषांतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकतीच तिची ‘अक्का’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. अभिनेत्री कीर्ती सुरेशसह राधिका या वेब सीरिजचे प्रमोशन करत आहे. यावेळी एका मुलाखतीदरम्यान राधिकाला तिच्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिकांबाबत विचारण्यात आले. यावर स्पष्ट मत मांडताना राधिकाने एका तेलुगू चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती.

राधिका आपटेचे वक्तव्य चर्चेत

राधिका म्हणाली, “मी एका तेलुगू चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये मला माझ्या मामाशी लग्न करावे लागले होते. ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होती. या भूमिकेतील प्रत्येक गोष्टीचा मला तिरस्कार वाटतो.”

राधिकाचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर कीर्तीला प्रथम आश्चर्य वाटले आणि नंतर तिला हसू आले. त्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या सूत्रसंचालक आणि प्रेक्षकांना उद्देशून कीर्तीने सांगितले की, “मामाशी लग्न करण्याची प्रथा तमिळ आणि तेलुगू समाजात खूप प्रचलित आहे.”

वयाने मोठ्या अभिनेत्याबरोबर रोमान्स करण्याबाबत काय म्हणाली राधिका

राधिकाच्या मते, तिच्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या अभिनेत्यासह रोमँटिक प्रसंग साकारणे आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या वातावरणात काम करणे, हे तिच्यासाठी सर्वाधिक आव्हानात्मक होते. याबाबत मत व्यक्त करताना ती म्हणाली, “हो, पण त्याचबरोबर मला माझ्यापेक्षा खूप वयाने मोठ्या अभिनेत्यासह रोमान्स करावा लागला. ही संपूर्ण परिस्थिती पुरुषप्रधान होती आणि तिथले वातावरणही पुरुषसत्ताक होते. माझ्यासाठी हीच सर्वात कठीण गोष्ट होती. त्यानंतर त्या प्रसंगात माझा मृत्यू होतो. त्या अभिनेत्याला मला (खांद्यावरून मागे फेकल्याचा हावभाव करत) फेकून द्यायचे होते आणि त्यानंतर अ‍ॅक्शन सीन करायचा होता. मी तर विचार करत होते की, आता माझा मृत्यू नेमका कधी होणार?”

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील रंगभेदावरही मांडले स्पष्ट मत

‘Galatta’ला दिलेल्या अलीकडील मुलाखतीत राधिका आपटेने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील रंगभेदावरही (Colourism) भाष्य केले. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये अभिनेत्रींची निवड त्यांच्या अभिनयकौशल्यापेक्षा गोऱ्या त्वचेच्या रंगाला प्राधान्य देऊन केली जात असल्याची टीका राधिकाने केली.

ती म्हणाली, “माझ्या मते, अनेक उत्तर भारतीय अभिनेत्रींना दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये संधी मिळण्यामागचे कारण म्हणजे त्यांचा गोरा त्वचेचा रंग होता. आणि मला ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वाटते.”

राधिका आपटेची कारकिर्द

राधिका आपटेने २०१० मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘रक्त चरित्र’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला होता.

त्यानंतर २०१२ मध्ये तिने प्रकाश राज यांच्या ‘धोनी’ या तमिळ चित्रपटात काम केले. हा चित्रपट तेलुगूमध्येही प्रदर्शित झाला होता. २०१४ मध्ये ती बालकृष्ण यांच्यासह ‘लेजेंड’ या चित्रपटात झळकली. त्यानंतर पुढच्याच वर्षी, म्हणजे २०१५ मध्ये, तिने सत्यदेव यांच्या ‘लायन’ या चित्रपटात पुन्हा बालकृष्ण यांच्यासह काम केले.