Allu Arjun Crush Sridevi : दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. मात्र, बालपणीच्या एका आठवणीने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ८० आणि ९० च्या दशकात संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवी यांच्यावर अल्लू अर्जुनचे प्रचंड प्रेम होते. श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केल्याचं समजल्यावर अल्लू अर्जुन दिवसभर ढसाढसा रडला होता.
“श्रीदेवी माझ्या क्रश होत्या. माझं त्यांच्यावर खूप प्रेम होते. मी त्यांच्यावर इतकं प्रेम करायचो की मला त्यांच्यासारखी दुसरी कोणतीच व्यक्ती दिसत नव्हती. जेव्हा मला समजलं की त्यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केलंय, तेव्हा मी दिवसभर रडत होतो. कारण माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता,” असं अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत सांगितलं.
शिर्डीमध्ये झालं होतं बोनी कपूर-श्रीदेवीचं लग्न
बोनी कपूर व श्रीदेवी यांचं लग्न म्हणजे बॉलीवूडमधील सर्वात चर्चेतलं प्रकरण. कारण बोनी पहिली पत्नी मोना शौरीबरोबर विवाहित असताना त्यांचं श्रीदेवीशी अफेअर सुरू झालं होतं. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचं लग्न २ जून १९९६ रोजी शिर्डी इथे झालं होतं. त्यांचा विवाहसोहळा अत्यंत खासगी पद्धतीने पार पडला होता. त्या लग्नाला फक्त कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते. नंतरही त्यांनी अनेक महिने लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. पण जानेवारी १९९७ मध्ये श्रीदेवी जान्हवीच्या वेळी गरोदर असताना त्यांच्या लग्नाबद्दल सर्वांना समजलं.
खरं तर श्रीदेवी यांनी लग्न केलंय हे समजल्यावर वाईट वाटलं असा अल्लू अर्जुन एकटा नव्हता. श्रीदेवीच्या लाखो चाहत्यांची हिच अवस्था झाली होती. ८० आणि ९० च्या दशकातील संपूर्ण पिढीसाठी श्रीदेवी या भारतीय सिनेमाच्या सर्वात मोठ्या महिला सुपरस्टार होत्या.
श्रीदेवीचे चित्रपट
श्रीदेवींनी वयाच्या चौथ्या वर्षी, १९६७ मध्ये ‘कंधन करूणई’ या तमिळ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी ५४ व्या वर्षी दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यांना जान्हवी कपूर व खुशी कपूर या दोन मुली आहेत.
अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, त्याच्याकडे सध्या भारतीय सिनेसृष्टीतील काही सर्वात मोठे चित्रपट आहेत. दिग्दर्शक ॲटलीबरोबरचा त्याचा आगामी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. ‘AA22xA6’ असं नाव या चित्रपटाला देण्यात आलंय. ‘सन पिक्चर्स’ निर्मित या चित्रपटात दीपिका पादुकोण मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत आहे. तसेच तो ‘लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स’ फेम दिग्दर्शक लोकेश कनकराज यांच्याबरोबरही एक सिनेमा करत आहे.
