खेळाडूची भूमिका साकारायला आवडेल -राजकुमार राव

राजकुमार सध्या ‘फन्ने खा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

rajkummar rao
राजकुमार राव

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड सुरु असून नुकताच संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून लवकरच तपन दास यांच्या जीवनावर आधारित ‘गोल्ड’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे आता अभिनेता राजकुमार रावलादेखील एखाद्या खेळाडूवर आधारित चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे.

बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा अभिनेता अशी राजकुमार रावची ओळख असून त्याने नुकतंच एखाद्या खेळाडूच्या जीवनपटावर काम करण्यास इच्छूक असल्याचं सांगितलं आहे. राजकुमारने शालेय जीवनामध्ये तायक्वांदो या खेळामध्ये अनेक पदके संपादित केली आहेत. त्याप्रमाणे त्याने राष्ट्रीय स्तरावरही हा खेळ खेळला आहे. त्यामुळे त्याचे अभिनयाएवढेच खेळावरही प्रेम आहे.

‘क्रीडा या प्रकाराशी माझं लहानपणापासून नातं जोडलं गेलेलं आहे. उत्तर भारतात बहुतांश मुलं क्रिकेटचे वेडे आहेत. सहाजिकचं आहे त्यामुळे माझ्या रक्तातही क्रिकेट धावतं. जेथे जागा मिळेल तेथे आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करतो. त्यामुळे क्रिकेटवर माझं निस्सिम प्रेम आहे. त्याबरोबरच मी दहा वर्ष तायक्वांदो हा खेळही खेळलो आहे. त्यामुळे मला हे दोन्ही खेळ प्रिय आहेत’, असं तो म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, क्रिकेट, ‘तायक्वांदोप्रमाणेच कबड्डी, हॉकी या खेळामध्येही चांगली कामगिरी करणारे खेळाडू होते आणि अजूनही आहेत. त्यामुळे अशा खेळाडूंच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटात झळकायला मला आवडेल. मला खेळाची आवड असल्यामुळे या चित्रपटांना मी पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न करु शकतो’.

दरम्यान, राजकुमार सध्या ‘फन्ने खा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर ऐश्वर्या राय -बच्चन, अनिल कपूर, सतिश कौशिक हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या ३ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: I want to do sportsman biopic says rajkummar rao