‘झोंबिवली’ चित्रपटाचे शूटींग डोंबिवलीत का झाले नाही? दिग्दर्शकाने सांगितले खरे कारण

यावेळी त्यांनी या चित्रपटाचे शूटींग डोंबिवलीत करता आले नाही याची खंतही बोलून दाखवली.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेला झोंबिवली चित्रपट आजपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित झोंबिवली चित्रपटाचे कथा झॉम्बी या कल्पनेवर आधारित आहे. डोंबिवलीमध्ये अचानक झॉम्बी हल्ल्यानंतर काय घडतं? याची थोडी थरारक, थोडी विनोदी अशी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक डोंबिवलीकर हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेक डोंबिवलीकरांनी हा चित्रपट डोंबिवलीत कुठे शूट केला? असा प्रश्न उपस्थित केला होता. नुकतंच लोकसत्ताच्या डिजीटल अड्डा या कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांना आम्ही हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर उत्तर दिले. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे शूटींग डोंबिवलीत करता आले नाही याची खंतही बोलून दाखवली.

आदित्य सरपोतदार नेमकं काय म्हणाले?

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी याबद्दल उत्तर देताना म्हटले की, हा चित्रपट करण्याचा विचारच त्या नावावरुन आला होता. झोम्बी फिल्म करायची हे सर्व मान्य आहे. पण काय कोणती करायची, मराठी कशी करावी? जेव्हा सुचलं तेव्हा डोंबिवलीत जर झोम्बी आले आणि त्या चित्रपटाचे नाव जर झोंबिवली असेल तर कसे वाटेल. त्यामुळे हा चित्रपट टायटलवरुन सुचला.

पहिलं टीझर पोस्टर काढल्यानंतर मला अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांचे फोन आले. तुम्ही हे नाव दिलं, तर डोंबिवलीचं नाव खराब होईल. लोक आता डोंबिवलीला झोंबिवली म्हणून ओळखायला लागतील, असे अनेक धमकीवजा सूचना मला देण्यात आल्या. पण हा कॉमेडी चित्रपट आहे. त्यामुळे त्याला किती सिरीयस घ्यायचे हे तुम्हीच ठरवा. जर लोकांना नाही आवडलं तर लोक सांगतील. जर तुम्ही या चित्रपटाचे नाव हेच ठेवणार असाल तर आम्ही तो चित्रपट या ठिकाणी लागू देणार नाही किंवा पोस्टर फाडू वैगरे, अशीही धमकी मिळाली. आता शूटींग सुरु झालं यावर बोलणं फार लवकर होईल, असे मी अनेकांना वारंवार सांगितलं.

त्यानंतर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी हा चित्रपट डोंबिवलीत शूट झालाय का? असेही विचारले. पण केवळ या धमकीवजा फोनमुळे आम्हाला हा चित्रपट डोंबिवलीत शूट करता आला नाही, असेही आदित्य सरपोतदार यांनी म्हटले.

याचे कारणच म्हणजे त्यावेळी तुम्ही डोंबिवलीत शूट करुन दाखवा वैगरे अशा धमक्या होत्या. एवढ्या सर्व टीमला घेऊन जाणार सेटवर काही तरी होईल यामुळे आम्ही लातूरमध्ये चित्रपट शूट केला. डोंबिवली ही लातूरमध्ये दाखवली. काही सीन निश्चित डोंबिवलीत शूट केले आहेत. पण मला संपूर्ण चित्रपट या ठिकाणी शूट करायचा होता. परंतु या कारणामुळे करता आला नाही, अशी खंत आदित्य सरपोतदार यांनी बोलून दाखवली.

‘झोंबिवली’ या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा झोम्बी या संकल्पनेवर आधारित आहे. हॉलिवूड चित्रपटात पाहिलेले झोम्बी खरंच डोंबिवलीत आल्यावर काय होतं हे या चित्रपटात विनोदी- थरारक अंदाजात दाखवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I wanted to shoot the whole movie in dombivali but not possible for these reason said the zombivali movie director nrp

Next Story
Indias Got Talent : स्पर्धकाचं टॅलेंट पाहून भडकल्या किरण खेर, म्हणाल्या…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी