सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता, त्यासाठी ओपनहायमर संस्कृत शिकले होते. चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख दोन ठिकाणी आला आहे, पण त्यातील एका ठिकाणी आलेला उल्लेख यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारा सिलियन मर्फी आणि चित्रपटातील अभिनेत्री यांच्यात चित्रित झालेल्या सेक्स सीनदरम्यान सिलियन मर्फी म्हणजेच ओपनहायमर हे भगवद्गीतेचं वाचन करताना दाखवण्यात आल्याने बऱ्याच लोकांनी याचा विरोध करायला सुरुवात केली. आणखी वाचा : "नोलन हा एकमेव दिग्दर्शक आहे जो…" 'ओपनहायमर'चं कौतुक करत राम गोपाल वर्मा यांनी खेचले बॉलिवूडचे कान काही लोकांनी आपल्या सर्टिफिकेशन बोर्डावरही लोकांनी ताशेरे ओढले असून सेन्सॉरने असे सीन्स पास कसे केले असा सवालही केला आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही यावर भाष्य केलं आहे. सेन्सॉरकडून असा सीन दाखवण्यासाठी मंजूरी तरी कशी मिळाली असा सवालही अनुराग ठाकूर यांनी केला आहे. 'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार अनुराग यांनी सीबीएफसीला याबद्दल चांगलंच खडसावलं आहे. इतकंच नव्हे तर हा सीन लवकरात लवकर चित्रपटातून हटवण्याबद्दलही अनुराग ठाकूर यांनी दबाव आणल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच चित्रपटातील या सीनवर कात्री चालू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाला पाहिल्याच दिवशी भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्व स्तरातून याचं कौतुक होत आहे. नोलनच्या या बहुचर्चित चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.