या महिन्याच्या अखेरीस गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. मात्र या महोत्सवातून दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ हा चित्रपट वगळण्यात आला आहे. महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे दोन चित्रपट वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. विशेष म्हणजे परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला.

इफ्फीच्या इंडियन पॅनारोमा सेक्शनच्या १३ परीक्षकांनी मिळून २६ चित्रपटांपैकी ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट निवडले होते. रवी जाधवच्या ‘न्यूड’ला ओपनिंग चित्रपटाचा बहुमानही मिळाला होता. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष यात रेखाटण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी अंतिम यादी जाहीर केली, ज्यामध्ये या दोन्ही चित्रपटांचा समावेश नव्हता.

दोन्ही चित्रपटांच्या नावावर आक्षेप घेत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. त्याऐवजी विनोद काप्रीचा ‘पीहू’ हा चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. या निर्णयाविरोधात परीक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘मंत्रालयाने ‘न्यूड’ हा चित्रपट वगळल्याचे कारण आम्हाला सांगावे आणि त्याऐवजी दुसरा चित्रपट निवडण्याची परवानगी आम्हाला द्यावी,’ असे परीक्षकांनी ई-मेलद्वारे मंत्रालयाला कळवले आहे.